नवी दिल्ली: केंद्रीय कॅबिनेटचा आज (7 जुलै) विस्तार होत आहे. पण या मंत्रिमंडळ विस्ताराआधी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना मात्र डच्चू दिला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. हर्षवर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देवोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं असल्याचं समजतं आहे. याशिवाय थावरचंद गहलोत यांनी कालच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. जाणून घेऊयात या मंत्र्यांच्या राजीनाम्यामागील नेमकी कारणं काय आहेत.
ADVERTISEMENT
थावरचंद गहलोत यांनी कालच आपल्या मंत्रिमपदाचा राजीनामा दिला आहे. थावरचंद गहलोत हे सामाजिक न्याय मंत्री होते. या व्यतिरिक्त, थावरचंद गहलोत हे राज्यसभेतील सभागृह नेते आणि भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य देखील होते. पण आता त्यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
थावरचंद गहलोत यांच्यानंतर ‘या’ मंत्र्यांकडून मागण्यात आला आहे राजीनामा
डॉ. हर्षवर्धन- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला असल्याचं समजतं आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेसंदर्भात मोदी सरकारवर ज्याप्रकारे प्रश्न उपस्थित केले जात होते ते पाहता आता डॉ. हर्षवर्धन यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं आहे. हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य मंत्रालयासह विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारीही आहे. म्हणजे हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यामुळे दोन मोठी मंत्रालये रिक्त झाली आहेत.
रमेश पोखरीयल निशंक- उत्तराखंडचे हरिद्वारचे खासदार रमेश पोखरीयल निशंक यांनाही राजीनामा देण्यास सांगितले आहे. ते शिक्षणमंत्री आहेत. नुकतेच रमेश पोखरीयल निशंक यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना महिन्याभरासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, प्रकृती बरी नसल्याचं कारण देत त्यांनी राजीनामा दिला आहे.
संजय धोत्रे- महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. ते शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री होते. असे सांगितले जात आहे की, संजय धोत्रे यांच्या कामावर पंतप्रधान नरेंद्र मोदी खूश नव्हते. त्यामुळे आता त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवून संघटनात्मक कामाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
सदानंद गौडा- कर्नाटकच्या उत्तर बंगळुरुचे भाजप खासदार सदानंद गौडा यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. ते रसायन व खते मंत्री होते. कोरोना कालावधीत औषधांच्या तुटवड्यामुळे मोदी सरकारवर जी टीका झाली त्यासाठी आता सदानंद गौडा यांना जबाबदार धरले जात असल्याची चर्चा आहे.
बाबुल सुप्रियो- पश्चिम बंगालमधील आसनसोलचे खासदार बाबुल सुप्रियो यांनीही राजीनामा दिला आहे. ते पर्यावरण मंत्रालयात राज्यमंत्री होते. असे म्हटलं जात आहे की, बाबुल सुप्रियो हे पक्षात नाराज होते. पश्चिम बंगाल विधानसभेतही बाबुल सुप्रियो यांनी निवडणूक लढविली होती. परंतु 50 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
देबोश्री चौधरी- पश्चिम बंगालमधील रायगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार देवोश्री चौधरी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. त्या महिला व बालविकास राज्यमंत्री आहेत. पश्चिम बंगाल भाजपामध्ये त्यांना महत्त्वाचे पद दिले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.
Cabinet Expansion : प्रीतम मुंडेंचं नाव मंत्रीपदाच्या शर्यतीतून मागे, पंकजा यांच्या ट्विटमुळे चित्र स्पष्ट?
संतोष गंगवार- उत्तर प्रदेशमधील बरेलीचे खासदार संतोष गंगवार यांनाही राजीनामा देण्यास सांगितले आहे. ते कामगार व रोजगार मंत्री (स्वतंत्र प्रभार) होते. कोरोना काळात संतोष गंगवार यांचे एक पत्र खूप व्हायरल झाले होते. ज्यात त्यांनी यूपी सरकारवर टीका केली होती. हेच पत्र त्यांना भोवलं असल्याची सध्या चर्चा आहे.
रतनलाल कटारिया- हरियाणाच्या अंबालाचे खासदार रतनलाल कटारिया यांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. ते जलशक्ती मंत्रालयात राज्यमंत्री होते. त्यांच्या जागी सिरसाच्या खासदार सुनीता दुग्गल यांना मंत्री केले जाणार असल्याचं समजतं आहे.
प्रताप सारंगी- ओडिशाच्या बालासोरचे खासदार प्रताप सारंगी यांनाही राजीनामा देण्यास सांगितले आहे. ते सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसह पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.
ADVERTISEMENT