राज्यात सध्या प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण जोरदार रंगलय. राज्यात येऊ घातलेले मोठंमोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलेलं असताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केलाय. त्याला उत्तर देताना जयंत पाटलांनीही मोठा गौप्यस्फोट करत पलटवार केलाय.
ADVERTISEMENT
फ्लोटिंग सोलार प्रकल्पावरून भागवत कराडांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. भागवत कराड काय म्हणाले, “मराठवाड्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेला नाही, पण जायकवाडीवर फ्लोटिंग सोलार व्हावेत म्हणून, वारंवार महाविकास आघाडी सरकार असताना परवानगी मागत होतो. नवीन सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. आणि त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून आम्हाला परवानगी दिलीये. हा प्रकल्प दोन वर्षापूर्वी सुरू झाला असता, तो आता सुरू होणार आहे.”
“जायकवाडी धरण हे मराठवाड्यासाठी महत्त्वाचं आहे. औरंगाबादला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा मराठवाड्यातील सिंचन असेल. बाष्पीभवनामुळे ३३ टक्के पाणी कमी होतं. त्यामुळे फ्लोटिंग सोलार प्रकल्प आला, तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकते. महाविकास आघाडी सरकार याला कारणीभूत होतं”, असा आरोप कराडांनी केलाय.
‘भागवत कराडांना लोकसभा लढवायला सांगितलंय’ जयंत पाटलांनी दिलं उत्तर
जयंत पाटील म्हणाले, “भागवत कराडांनी असा आरोप केलाय की महाराष्ट्र सरकारने आणि जयंत पाटलांनी फ्लोटिंग सोलार पॅनेल बसवून वीज निर्मितीचा प्रकल्प नाकारला. असा नकार जयंत पाटलांनी दिला असेल, तर त्यांनी कागद द्यावा. महाराष्ट्र सरकारने करत नाही, असं म्हटलं असेल, तर त्यांची माहिती द्यावी.”
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, “त्यांनी मला फोन केला होता. मी त्यांना म्हटलं की, तुम्ही एक पत्र पाठवा. त्यांनी एक पत्र पाठवलं. मी त्यावर समिती नेमून त्यावर दोन महिन्यात निष्कर्ष काढावा, असे आदेश दिले. त्या विभागाच्या सचिवांना आदेश दिले होते. त्याचे निष्कर्ष समोर आल्यानंतर पुढचं सरकार त्यावर काम करेल”, असं त्यांनी सांगितलं.
“भागवत कराडांना भाजपनं औरंगाबाद लोकसभेतून उभं राहायला सांगितलंय. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांना सांगितलंय की पुढच्या वेळी राज्यसभा नाही. लोकसभा लढवायची आहे. लोकसभेत औरंगाबादच्या जनतेला इप्रेस करण्यासाठी त्यांचे हे सगळे उद्योग चाललेत. त्यांना फारसं महत्त्व नाही”, असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे.
“त्यांना आता काही जमत नसेल, तर ते अशी विधानं करत असतील. त्यांनी सांगावं की जयंत पाटलांनी नकार कधी दिला. निगेटिव्ह पत्र आमच्याकडून कधी गेलं. त्यांना कुणी नाही म्हटलं. प्रकल्प कधीच थांबवला नाहीये. त्यांनी काही फार मोठा तीर मारलेला नाहीये. त्यांनी काही प्रकल्प आणलेला नाहीये. त्यांनी कल्पना मांडली. फ्लोटिंग सोलार पॅनेलची. त्याची चर्चा विभागात आधीपासूनच आहे”, असा पलटवार जयंत पाटील यांनी केला.
ADVERTISEMENT