चंद्रकांत पाटील वादाच्या भोवऱ्यात; महापुरुषांवरील वक्तव्यानंतर विरोधकांनी घेरलं

मुंबई तक

09 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:36 AM)

मुंबई : भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधान केली जात असल्याचा आरोप होत असतानाच आता मंत्री चंद्रकांत पाटील हे ही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल एका विधाननंतर ते आता टीकेचे धनी झाले आहेत. काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? पैठणमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्याला संत […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधान केली जात असल्याचा आरोप होत असतानाच आता मंत्री चंद्रकांत पाटील हे ही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल एका विधाननंतर ते आता टीकेचे धनी झाले आहेत.

हे वाचलं का?

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

पैठणमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्याला संत विद्यापीठ सुरु करायचं असेल तर सरकार नक्की मदत करतील. मी आणि संदीपान भुमरे अशा चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो तर पैशांची कमतरता येणार नाही.

पण माझं म्हणणं आहे की सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कोणी सुरु केल्या? शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. मला शाळा चालवतोय, पैसे द्या. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.

पुढे ते म्हणाले, आता त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे, हेही त्यांनी नमूद केलं.

विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांना घेरलं…

याच विधानावरुन चंद्रकांत पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पाटील यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, महात्मा फुले हे उद्योजक देखील होते. त्यांनी उभी केलेली रचनात्मक सामाजिक कामे हि स्वतःच्या कष्टाच्या पैशांतून उभी केलेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विधिज्ञ, पत्रकार व प्राध्यापक होते. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यावेळी ते केंद्रीय मजूर मंत्री होते.

राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ’फुले – आंबेडकरांनी भीक मागून शाळा उभारल्या’ हे विधान चुकीचे तर आहेच पण महापुरुषांच्या रचनात्मक कार्याच्या उभारणीला भीक मागण्याची उपमा देणे, हा त्यांचा जाणून बुजून केलेला अपमानच आहे. चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर भाजपचे लोक आता जाणून बुजून महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत, अशी टीका केली.

तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील तुम्ही ज्या शाळेत शिकला ना त्या शाळेमध्ये मूल्यांचे शिक्षण कधी नाही मिळालं. कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नीने हॉस्टेलमधील मुलांना जेवायला मिळालं नाही म्हणून वेळप्रसंगी मंगळसूत्र विकून पोरांसाठी जेवणं आणला आणि शिक्षण दिलेलं आहे.

या महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण नावाच्या संस्थेने जे जाळं उभं केलं त्यामुळे अनेक नेते अनेक मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊस मधले सीईओ पदाधिकारी तयार झाले. आर. आर. पाटील आपण आठवण करत असाल तर ते सुद्धा रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकले. महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील या लोकांनी या देशातल्या बहुजनाला, गरीबला शिकून मोठा केलं आणि त्याचं तुम्ही भिक मागून केलं अशा पद्धतीचं वर्णन करता? थोडी तरी लाज बाळगा.

महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी देशाला दिशा दाखवली आहे त्याचा अभिमान बाळगाच्या ऐवजी आपण सातत्याने शिवाजी महाराज, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, आणि आता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत तुमची मजल जाते, थोडी तरी लाज बाळगा, अशी टीका केली.

    follow whatsapp