राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानाने घेरले गेलेत. विरोधकांनी राज्यपाल कोश्यारींसह भाजपवरही टीकेचा भडीमार केला. या वादावर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या वादावर भाष्य केलंय.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राज्यपाल कोणत्या संदर्भात बोलले याची मला माहिती नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत, होते आणि अनेक पिढ्यांचे आदर्श राहतील. त्यांची बरोबरी, त्यांची तुलना या देशामध्ये आणि राज्यामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर, सन्मान हा संपूर्ण देशानं, राज्यानं करायलाच पाहिजे. त्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही”, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाले होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते की, “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा शिक्षक आम्हाला विचारायचे की, तुमचा आवडता नेता कोण? कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी, कुणी पंडित नेहरूंचं नाव घ्यायचं. मला वाटतं आता हा प्रश्न आला की तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले आहेत. मी आत्ताच्या काळाबाबत बोलतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत”, असं कोश्यारी म्हणाले होते.
‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाचवेळा असं पत्र लिहिलं होतं’, भाजप प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान
विरोधकांनी राज्यपालांच्या विधानावर काय केलीये टीका?
“महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अंदाधूंद बोलण्याचा विकार राज्याचे महामहिम राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांना जडला आहे. यापूर्वीही त्यांनी केलेल्या वक्तव्यातून राज्यातील सामाजिक शांतता भंग पाडण्याचे काम झालेच”, असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलेलं आहे.
“आजही महाराजांविषयी केलेला उल्लेख हा खेदजनक म्हणावा लागेल. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान हे कालही, आजही व सदैव आदर्शाचे आहे मात्र ऐवढ्या बौधिकक्षमतेपर्यंत पोहण्यास काहीजण अपवाद ठरतात हे वर्तमान स्थितीतील राज्यपाल पदाचेही दुर्भाग्य म्हणावे लागेल”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलीये.
PM मोदींना माझी हात जोडून विनंती, कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर काढा : संभाजीराजे छत्रपती
“माननीय राज्यपालांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होताना दिसतोय म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही करत सुटलेत. काळ जुना असो किंवा नवा छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी नेहमीच आदर्श असतील. तुमचे आदर्श तुम्हाला लख लाभो, डोक्यावर घेऊन नाचा त्यांना”, अशी टीका काँग्रेसनं केलीये.
ADVERTISEMENT