सिंधुदुर्ग: यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एका महत्त्वाची बातमी आहे. 1 हजार 800 गणेशभक्तांसाठी भाजपा आमदार नितेश राणे हे दादरहून स्पेशल ‘मोदी एक्सप्रेस’ ट्रेन सोडणार आहेत.
ADVERTISEMENT
आमदार नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांना नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यामुळेच यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी गणपतीत नितेश राणे यांनी विशेष ‘मोदी एक्सप्रेस’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा याबाबत नितेश राणे नेमकं काय म्हणाले!
‘देशाचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कोकणाला फार मोठी भेट दिली आहे. कोकणाचे भूमिपुत्र सन्माननीय राणे साहेब यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन कोकणातील जनतेला एक आशीर्वादच दिलेला आहे. आपल्याला आठवत असेल की, गेल्या नऊ वर्षापासून मी कोकणातील जनतेसाठी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बसेस सोडतो. 100 रुपयामध्ये त्या बसेस उपलब्ध असतात.’
‘आपल्या कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थी हा फार मोठा सण आहे. महाराष्ट्रातील कानकोपऱ्यात राहणारा कोकणी माणूस तो कितीही व्यस्त असेल कुठल्याही मोठ्या पदावर असेल पण सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्या गावाकडे या दिवसात हमखास जातो. म्हणून या वर्षी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करण्यासाठी मी यावेळी बसेस सोडत नाही तर मी पूर्णच्या पूर्ण ट्रेन सोडतोय.’
‘मोदी एक्सप्रेस’ नावाची ही ट्रेन मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावाकडे घेऊन जाणार आहे. एकावेळी 1800 जणांना या ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ही ट्रेन दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरुन निघणार आहे.’
‘हा पूर्ण प्रवास विनामूल्य आणि मोफत असेल. या पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला एक वेळचं जेवण आम्ही आमच्याकडून देणार आहोत.’
‘या ट्रेनचं बुकींग 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. ही ट्रेन दादर ते सावंतवाडी अशी धावणार आहे. पण यात दोन विशिष्ट स्टॉप देण्यात आले आहेत. ती म्हणजे एक वैभववाडीला थांबणार आणि दुसरी कणकवलीला थांबणार. या पूर्ण 18 डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये आपण सर्व जण सुरक्षित पद्धतीने जाल यासाठी संपूर्ण काळजी आम्ही आपल्या पद्धतीने घेणार आहोत.’
कोकण रेल्वे कोकणात कशी आली?
‘कोकणातील जनतेमुळे आम्हाला फार मोठा आशीर्वाद मिळालेला आहे. म्हणूनच या वर्षी मोदी साहेबांचे आभार मानण्यासाठी मोदी एक्सप्रेस गणपती स्पेशल ही यावर्षी धावणार आहे.’ असं नितेश राणे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT