मुंबई: 23 नोव्हेंबर 2019 या तारखेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळी परिमाणंच बदलून गेली. कारण याच दिवशी महाराष्ट्रात भल्या पहाटे एक अशी राजकीय घटना घडली होती की, ज्याने अवघा महाराष्ट्राला राजकीयदृष्ट्या हादरवून टाकलं होतं. होय… तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजभवनात झालेला शपथविधी. आता तुम्ही म्हणाल की, या विषयाची चर्चा आता का? तर त्याचं नेमकं कारण तुम्हाला पुढे समजलेच..
ADVERTISEMENT
काहीही झालं तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही. असं एकदा नव्हे तर तीन-तीनदा सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर 23 नोव्हेंबर 2019 रोजी थेट अजित पवार यांच्या पाठिंब्याने शपथविधी आटोपला होता. याच शपथविधीनंतर सत्तेसाठी काहीही केलं जाऊ शकतं यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. आता या घटनेला बराच काळ उलटून गेला आहे. पण असं असताना याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे ती सत्तेत असणाऱ्या शिवसेना आणि विरोधात असलेल्या भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमुळे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध प्रचंड ताणले गेले होते. त्यातही भल्या पहाटेच्या शपथविधीच्या संपूर्ण राजकीय नाट्यानंतर यथावकाश महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण हे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने त्यावर टीकेची झोड उठवलेली आहे. हे सरकार आपल्याच ओझ्याने सहा महिन्यांच्या आत पडेल असं भाजप नेते म्हणत होते. पण आता या सरकारने साधारण दोन वर्षांच्या जवळपास कालावधी पूर्ण केला आहे.
आता एवढा काळ उलटल्याने हे सरकार काही पडत नसल्याचं लक्षात आल्याने भाजपने राजकीय पटलावरील आपला मोहराच बदलून टाकला असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सरकार पडणार असं वक्तव्य करणारे भाजप नेते पुन्हा एकदा शिवसेनेला खुणावू लागल्याचं दिसत आहे. दुसरीकडे शिवसेनेने देखील भाजपला गोंजारण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना-भाजपमध्ये सत्तेसाठी बंद दाराआड चर्चा?
शिवसेना आणि भाजप हे जुने मित्र पुन्हा जवळ येऊ लागले आहेत. असं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये काही खलबतं तर सुरु नाही ना? अशी चर्चा सध्या रंगली आहेत. पण या चर्चेबाबत भाष्य करण्याआधी भाजप आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांनी नेमकी काय-काय वक्तव्यं केली आहेत ते एकदा पाहूयात.
1. चंद्रकांत पाटील: ‘माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करू नका. दोन-तीन दिवसात काय ते कळेल.’
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे: ‘आज मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी’
3. देवेंद फडणवीस: ‘त्यांच्या शुभेच्छा ठीक आहे. चांगली गोष्ट आहे… राजकारणात कधीही काही होऊ शकते. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत. आणि हे जे अनैसर्गिक गटबंधन झालं आहे, हे फार काळ चालू शकत नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांनाही याची जाणीव झाली असेल; अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल’
अशी वक्तव्यं मागील दोन दिवसात प्रमुख नेत्यांनी केली आहेत. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपमध्ये काही तरी शिजतंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
2019 साली महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, समांतररित्या देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत देखील चर्चा सुरु होती. प्रामुख्याने अजित पवार यांच्यासोबत. पण या चर्चा एवढ्या गुप्तरित्या पार पडत होत्या की, त्याचा साधा सुगावा देखील कुणाला लागू शकला नव्हता. त्यामुळे आता देखील अशाच प्रकारे भाजप आणि शिवसेनेत काही चर्चा सुरु झाल्या असण्याची दाट शक्यता अनेकांकडून वर्तवली जात आहे.
शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या भरवश्यावर सत्ता स्थापन करेल का? हा कळीचा मुद्दा आहे. कारण राज्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेसाठी या घडीला भाजपसोबत जाणं ही एक मोठी जोखीम ठरु शकते. मात्र, पुढील काही समीकरणं लक्षात घेता बंद दाराआड भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये खलबंत सुरु असण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.
सध्या तरी दोन्ही पक्षांकडून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, याचा अर्थ असाही होत नाही की दोन्ही पक्षांमध्ये अजिबातच चर्चा नाही. सत्तेसाठी नेते मंडळी कोणता डाव टाकतील कधी टाकतीला याचा सध्या तरी काहीही नेम नाही. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण हे अधिकच रंजक होत जाणार एवढं मात्र नक्की.
ADVERTISEMENT