आज बाळासाहेब असते, तर ‘तोच’ सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला असता -भाजप

मुंबई तक

• 01:45 PM • 28 Mar 2022

“सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वाया घालवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राज्यासमोरचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आतातरी कामाला लागावे,” असा टोला भाजपने मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात […]

Mumbaitak
follow google news

“सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वाया घालवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राज्यासमोरचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आतातरी कामाला लागावे,” असा टोला भाजपने मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते.

हे वाचलं का?

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देताना उपाध्ये म्हणाले, “टोमणे ऐकत करमणूक करून घेण्याची महाराष्ट्राच्या जनतेची सहनशीलता आता संपली असून, समस्यांना तोंड देताना जनता त्रस्त झाल्याने कामाला लागा, समस्या सोडवा. एसटी संप, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण याबाबत मुख्यमंत्री चकार शब्द उच्चारत नाहीत.”

“गेल्या अडीच वर्षांत नाकर्त्या सरकारमुळे महाराष्ट्राची सर्व क्षेत्रांत नाचक्की झाली. विकासाची कामं ठप्प झाली. खंडणी वसुली, खून, बलात्कार, भ्रष्टाचाराची पाळेमुळे थेट मंत्रालयात घुसली. मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या गोतावळ्याने या कोंबडीला कसे लुटले ते जाधव यांच्या पराक्रमातून जनतेसमोर आलं आहे”, असा आरोप उपाध्ये यांनी केला.

“ठाकरे सरकारमधील भ्रष्ट मंत्री अनिल देशमुख यांनी याच मुंबईतून थेट पोलिसांनाच शंभर कोटींचे खंडणीवसुलीचे टार्गेट दिले. मुख्यमंत्र्यांच्या गोतावळ्यातील यशवंत जाधव यांनी कंत्राटदारांना हाताशी थरून याच मुंबईतून कोट्यवधींची माया गोळा केली. मातोश्रींना दोन कोटी रुपयांची रोकड आणि पन्नास लाखाचे महागडे घड्याळ भेट देणाऱ्या जाधवांच्या अफरातफरीच्या कारवाया जगासमोर उघड होऊनही मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का,” असा सवाल उपाध्ये यांनी केला. दरम्यान या प्रकरणातील यशवंत जाधव यांच्या कथित मातोश्रीचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

“गेल्या अडीच वर्षांत ठाकरे सरकारनं जनतेची एकही समस्या सोडविली नाही. राज्यात भ्रष्टाचार, गुंडगिरी, बोकाळली. महिलांवरील अत्याचार वाढले. सामान्य कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. शेतकऱ्याना नैराश्य आलं. आत्महत्या वाढल्या. अशा भीषण परिस्थितीत मुख्यमंत्री मात्र टोमणे मारत पांचट विनोदातून जनतेची करमणूक करण्याचा प्रयत्न करीत समस्यांपासून लक्ष विचलित करण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत,” असा आरोप उपाध्ये यांनी केला.

“शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच बोलघेवडेपणाबद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना खडसावलं होतं. दोन वर्षे केवळ घोषणाबाजी केल्यानंतर, आता घोषणा पुरेत, कामाला लागा, असा जाहीर सल्ला बाळासाहेबांनी जोशी यांना दिला होता. आज बाळासाहेब असते, तर तोच सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असता”, असंही उपाध्ये म्हणाले.

    follow whatsapp