Shiv Sena and BJP Ashirwad Yatra : शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या यात्रांचं आयोजन केलं जात आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईत निष्ठा यात्रा काढली, तर महाराष्ट्रात शिव संवाद यात्रा. त्याचबरोबर ठाकरे गटातील नेत्यांची महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यातच आता ठाकरेंनी आणखी एका यात्रा सुरू केलीये, ती म्हणजे शिवगर्जना यात्रा. ठाकरे गटाकडून काढला जात असलेल्या यात्रेविरोधात भाजप-शिवसेनेनं यात्रेचीच रणनीती आखलीये. ती समजून घेऊयात…
ADVERTISEMENT
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय यात्रांचा मार्ग अवलंबला आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईतील बंडखोर आमदारांच्या विरोधात निष्ठा यात्रा काढली, तर मुंबई बाहेरील बंडखोर आमदारांविरोधात शिव संवाद यात्रा.
उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात सुरु झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. आता ठाकरे गटाने तालुका पातळीवर पोहोचण्यासाठी शिवगर्जना यात्रा सुरू केलेली असतानाच भाजप-शिवसेनेनं एका यात्रेची घोषणा केलीये. ती यात्रा म्हणजे आशीर्वाद यात्रा!
‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी; विधानसभेला तर 200..’, संजय राऊतांचा दावा
भाजप-शिवसेनेची आशीर्वाद यात्रा कशी असणार?
भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेची मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी माहिती दिली. भाजप-शिवसेनेची आशीर्वाद यात्रा 5 मार्चपासून सुरु होणार आहे. ही यात्रा लोकसभा मतदारसंघात असणार आहे.
भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, याच अनुषंगाने भाजपा आणि शिवसेनेच्यावतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा रविवारी (ता. ५) मार्च पासून सुरू होत आहे.
दीड दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एका रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाणार आहे. अशा सहा यात्रा काढल्या जाणार आहेत.
5 मार्च, 9 आणि 11 मार्च या तीन दिवस प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर 14 मार्चला दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्य होणार आहे.
आदित्य ठाकरेंच्या वरळीतून भाजप-शिवसेनेची आशीर्वाद बाईक रॅली
रविवारी (5 मार्च) वरळीतील जांबोरी मैदानातून आशीर्वाद बाईक रॅली काढण्यात येणार आहे. जांबोरी मैदानातून सुरू होणारी ही रॅली मुंबादेवी मंदिराजवळ संपणार आहे. रात्री 9 वाजता आरती करून रॅलीचा समारोप होणार आहे. आशीर्वाद बाईक रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मुंबईतील भाजप-शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नेते सहभागी होणार आहेत.
‘सरपटणारा प्राणी, कॉण्ट्रक्ट किलर..’ निवडणूक आयोगासह मोदी-शाहांवर घणाघात
निष्ठा यात्रा विरुद्ध जागर मुंबईचा
मुंबईत यापूर्वी आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला उत्तर म्हणून भाजपकडून जागर मुंबईचा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा मुंबईतील वेगवेगळ्या भागात झाल्या होत्या. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या यात्रेतून प्रामुख्यानं केला गेला होता. त्यामुळे आता आशीर्वाद यात्रेतून नेमके कोणते मुद्दे मांडली जातील, हेही महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT