मुंबईत डेंग्यू, मलेरियाचा प्रभाव वाढला आहे, त्यामुळे महापालिकेने मुंबईत ड्रोनच्या मदतीने जंतूनाशक फवारणीचा निर्णय घेतला आहे. डेंग्यू मलेरियाच्या डासांची उत्पत्ती स्थळं शोधून औषध फवारणी केली जाणार आहे. मुंबईतल्या धोबीघाट भागात या प्रयोगाची यशस्वी चाचणी करण्यात आली.
ADVERTISEMENT
मलेरिया, डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थानं नष्ट करण्यासाठी महालक्ष्मी भागात असलेल्या धोबीघाट येथे नागरिकांच्या घरांच्या छतांवर ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली. जी दक्षिण या भागात मोठ्या प्रमाणात मोडकळलीला आलेल्या मिल्स,लोअर परळ भागातील रेल्वे वर्कशॉपच्या ठिकाणी असलेले रूफ गटर, झोपडपट्टीच्या भागात लावण्यात आलेली ताडपत्री अशा ठिकाणी पाणी साठून तिथे डासांची उत्पत्ती होत असते. या सगळ्याची पाहणी करण्यासाठी आणि अळीनाशक फवारणी करण्यासाठी किटक नियंत्रण खात्यातील कर्मचाऱ्यांना पोहचता येत नाही. त्यामुळे अशा अडचणींच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांचा फैलाव वाढू नये म्हणून ड्रोन द्वारे फवारणी करण्यात आली.
ड्रोन फवारणीबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘धोबीघाट भागात आज औषधाची फवारणी ड्रोनद्वारे करण्यात आली. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पोहचणं शक्य नसल्याने हा निर्णय घेतला गेला. अनेक ठिकाणी वरच्या भागांमध्येही पाणी साठतं. तिथे पोहचणं कर्मचाऱ्यांना शक्य नसतं म्हणून ही फवारणी अशा प्रकारे करण्यात आली. डेंग्यू आणि मलेरिया या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला. डासांचा प्रादुर्भाव झाला की ते डास साधारण तीन किमी अंतरापर्यंत रोगाचा प्रसार करू शकतात. दरम्यान लोकांनीही घराच्या उंच भागांमध्ये पाणी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे’ असंही आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं.
29 ऑगस्टपर्यंत मुंबईत 3338 मलेरियाचे रूग्ण आढळले आहेत. यातल्या 790 केसेस एकट्या ऑगस्ट महिन्यातल्या आहेत. तर 209 डेंग्यू रूग्ण आढळले आहेत ज्यापैकी 132 रूग्ण ऑगस्ट महिन्यात आढळले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 129 रूग्ण इतकीच होती. त्यात आता वाढ झाली आहे त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून ड्रोनने औषध फवारणी करण्यात आली आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव आणि पर्यायाने डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे लोकांनी खिडक्यांना जाळ्या बसवून घेणे, मच्छरदाणीचा वापर करणं, पाणी जास्त प्रमाणात साठू न देणं या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असंही महापालिकेने म्हटलं आहे.
एकीकडे मुंबई महापालिकेने ही उपाय योजना केली असताना महापालिकेत विरोधात असणाऱ्या काँग्रेसने मुंबई महापालिकेच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नगरसेवक रवि राजा यांनी मुंबई महापालिका पाण्याद्वारे पसरणारे आजार रोखण्यात अपयशी ठरली असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT