न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन रेल्वे स्थानकात मंगळवारी हादरलं. स्थानकात घुसरलेल्या एका हल्लेखोराने नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात २० नागरिक जखमी झाले आहेत. ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून, संशयिताचा फोटो समोर आला आहे.
ADVERTISEMENT
ब्रुकलिनमधील सनसेट पार्कमध्ये ३६ स्ट्रीट स्थानकात स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडली.
अंदाधुंद गोळाबारानंतरची रेल्वे स्थानकातील काही दृश्ये समोर आली आहेत. ज्यात रक्ताने माखलेले प्रवासी पडलेले दिसत आहेत. तर काही जण जखमींना घेऊन जाताना दिसत आहे.
गर्दी असण्याच्या काळातच हल्लेखोरांने गोळीबार केला. हल्लेखोर गॅस मास्क घालून आला होता. सार्वजनिक बांधकामाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कामगारांचा विशिष्ट गणवेश असतो, त्याचप्रमाणे हल्लेखोराने नारंगी रंगाचे कपडे घातलेले होते.
रेल्वे स्थानकात घुसलेल्या हल्लेखोराने आधी धूर निर्माण करणारा ‘स्मोक ग्रेनेड’सारखंच काही फेकलं. ज्यामुळे स्थानकात धूर पसरला. या धूराचा परिणाम हल्लेखोरावर झाला नाही, कारण त्याने मास्क घातलेला होता.
धूर पसरल्यानंतर हल्लेखोराने अचानक गोळीबार सुरू केला. या अंदाधुंद गोळीबारात २० जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर सुरुवातीला समोर आलेल्या माहितीत १० नागरिक जखमी झाले असल्याचं म्हटलं गेलं होतं.
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर रेल्वे स्थानकातील दृश्य बघणाऱ्यांच्या अंगावर शहारे आणणारं होतं. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. तर रक्तबंबाळ झालेले लोक जमिनीवर पडलेले होते.
रेल्वे स्थानका घडलेल्या गोळीबाराबद्दल सॅम कॅरकेमो या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, “रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीचा दरवाजे उघडले होते. मला उतरायचं होतं. मी दरवाजाजवळ आलो आणि बाहेर बघितलं. तेव्हा रेल्वे स्थानकात सर्वत्र धूर झालेला होता. सर्वत्र रक्त उडालेलं होतं आणि जखमी जोरजोराने ओरडत होते.”
दरम्यान, एक फोटो समोर आला असून, ही व्यक्ती संशयित आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे. या आरोपीची पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याचंही स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.
संशयित व्यक्तीचं नाव फ्रँक जेम्स असल्याचं सांगण्यात आलं आहे. न्यूयॉर्क पोलीस विभागाने त्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे. पोलिसांनी एक गाडी जप्त केली असून, या गाडीचा वापर आरोपीने सब-वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT