ADVERTISEMENT
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. ‘आज गरीबाच्या घराची किंमतही लाखो रुपये आहे. पक्कं घरं असणारा गरीबही आज लखपतींच्या पंक्तीत आला आहे,’ असं मोदी म्हणाले.
‘आज गरिबांना सुविधा मिळत आहे. तुम्ही जर लोकांशी जोडलेले असता, तर या सगळ्या गोष्टी दिसल्या असत्या. 2014 चा काटा अजूनही अडकलेला आहे. देशातील जनतेनं तुम्हाला ओळखलं आहे. प्रश्न निवडणूक निकालांचा नाही, तर नीतीमत्तेचा आहे,’ असं अशी टीका मोदींनी केली.
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी शायरीतून मोदी सरकारवर केलेल्या टीकेला मोदींनीही शायरीतून उत्तर दिलं. ‘वो जब दिन को रात कहें, तो तुरंत मान जाऊं, नहीं मानोगे, तो वो दिन में नकाब ओढ़ लेंगे। ज़रूरत हुई तो हकीकत को थोड़ा बहुत मरोड़ लेंगे, वो मगरूर हैं खुद की समझ पर बेइंतहा। उन्हें आईना मत दिखाओ, वो आइने को भी तोड़ देंगे।’, या शेरमधून मोदींनी उत्तर दिलं.
‘कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या भारतीयांची संख्या जवळपास 100 टक्क्यांवर पोहोचली आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्याही 80 टक्क्यांवर पोहोचली आहे. कोरोना जागतिक महामारी होती. त्याच काळात काँग्रेसने हद्द पार केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकावर उभं राहून फुकट तिकीटं दिली आणि म्हणाले जा तुम्ही कोरोना पसरवा. श्रमिकांना काँग्रेसने अडचणींमध्ये ढकललं,’ असं मोदी म्हणाले.
‘काँग्रेसला महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण झालेलं बघायचं नाही. योग जगभरात स्वीकारला गेला. काँग्रेसने त्यालाही विरोध केला. माझ्या मनात कधी कधी विचार येतो की, आपण (काँग्रेस) ज्या पद्धतीने बोलत आहात, त्यावरून असं वाटतंय की 100 वर्ष सत्तेत यायचं नाही. असं करायला नको. तुम्ही जर ठरवलं असेल, तर मी सुद्धा तयारी केली आहे.’
‘कोरोना काळात सरकारने एकाही व्यक्तीचा भुकेमुळे मृत्यू होऊ दिला नाही. कोरोना काळात कृषी निर्यात सर्वोच्च स्थानी राहिली. मोबाईल फोनच्या निर्यातीतही वाढ झाली. संरक्षण क्षेत्रातूनही निर्यात केली जात आहे. यामुळे लोकांना (विरोधकांना) त्रास होतोय’, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली.
‘काँग्रेस अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समस्या बघू शकली नाही. आपण अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वाटेत अडथळे निर्माण करत राहिलात. शेतकऱ्याला सक्षम करावं लागेल. कृषी क्षेत्राला सक्षम करायचं असेल, तर शेतकऱ्याला सक्षम करावं लागेल. ज्यांना शेतकऱ्यांचं दुःख, वेदना समजल्या नाहीत, त्यांनी त्यावर राजकारण करू नये,’ असं म्हणत मोदींनी विरोधकांवर टीका केली.
‘आज काँग्रेस सत्तेत असती, तर महागाईचा मुद्दा कोरोनाच्या नावावर टाकून निघून गेली असती. पण आम्ही समस्या समजून घेतल्या आणि काम करतोय. अमेरिकेसारख्या देशात महागाई 7 टक्के आहे. पण आम्ही कुणावर तरी याचं खापर फोडून पळून जाणारे नाही आहोत’, असं मोदी म्हणाले.
‘महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही काय केलंय, हे आकडेवारीच सांगत आहे. काँग्रेसच्या काळात महागाई 10 टक्क्यांपेक्षा जास्त होती. 2014-2020 मध्ये भाजपच्या काळात महागाई 5 टक्के राहिली. कोरोना काळातही महागाईचा दर 3 टक्के राहिला’, असं मोदी यांनी सांगितलं.
‘जे लोक इतिहासातून शिकत नाही. ते इतिहासातच रममाण होतात. 60-80 च्या दशकात जेव्हा काँग्रेसची सरकार होती, तेव्हा बोललं जायचं की टाटा-बिर्ला यांचं सरकार आहे. नेहरू-इंदरा गांधींसाठीही हे बोललं जायचंय. मेक इंडिया होऊ शकत नाही, असं सांगितलं जातं. तुम्ही देशातील युवकांचा अपमान केला. देशात निराशेचं वातावरण निर्माण केलं, कारण स्वतः यशस्वी होत नाही आहात,’ असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवरही टीका केली.
ADVERTISEMENT