सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधली सुंदोपसुंदी काहीकेल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी केंद्राने कातडी बचाव भूमिका घेऊ नये असं वक्तव्य केलं होतं. ज्याचा समाचार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला. चंद्रकांत पाटलांच्या टीकेला आता अशोक चव्हाणांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
राज्य सरकार नौटंकीबाज आहे – मराठा आरक्षणावरुन फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका
सत्ता गेल्याचे नैराश्य, सत्ता मिळत नसल्यामुळे हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या फुलप्रुफतेचा सर्वोच्च न्यायालयात भांडाफोड झाल्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यांना चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे असं म्हणत अशोक चव्हाणांनी पाटलांवर टीका केली आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील??
रोज सकाळी उठून मोदींच्या नावाने बोंब मारायची हे अशोक चव्हाणांना राहुल गांधी यांनी शिकवलं आहे. अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या नेत्यांनी हेच धोरण धरलं आहे. त्यांना वाटतं की एक बोंब मारली एक इंजेक्शन पडतं. दोन बोंबा मारल्या की दोन सिलिंडर पडतात असं त्यांना वाटतं.
मराठा आरक्षणावर केंद्र सरकारने जशी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे तशी लवकरात लवकर आता राज्यानेही करावी. गायकवाड समितीच्या अहवालावरून मराठा समाज मागास आहे हे विधानसभेत कायदा करताना मान्य झालं होतं. हायकोर्टातही तो निकष मान्य झाला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला. त्यामुळे 102 व्या घटनादुरूस्तीमध्ये न्याय मिळाला तरीही दोन गोष्टी राहतात, एक म्हणजे मराठा समाज मागास आहे की नाही आणि दुसरा म्हणजे 50 टक्केच्या वर आरक्षण द्यायचं की नाही. महाराष्ट्र सरकारला आता दुसरा काही मार्ग उरलेला नाही, त्यांना मागास आयोगाची स्थापना नव्याने करावी लागेल.
मराठा आरक्षण राज्य सरकार हे केंद्रावर ढकलतं आहे ते चुकीचं आहे. त्यांना तातडीने मागास आयोग स्थापन करावा लागेल. तोपर्यंत काय करायचं तर फडणवीस सरकारने जे म्हटलं होतं की जे ओबीसींना तेच मराठ्यांना तो निकष त्यांना कायम ठेवावा लागेल. जे ओबीसींना तेच मराठ्यांना असं जर ठाकरे सरकारने केलं तर मराठा आरक्षण मिळेपर्यंत अनेकांचे प्रश्न मार्गी लागू शकतात असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT