मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आणि या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मुंब्रा खाडीत सापडलेला मृतदेह या प्रकरणात NIA ने आज आणखी एक मोठी कारवाई केली आहे. माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि शिवसेना उपनेते प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी NIA ने प्रदीप शर्मांच्या राहत्या घरी छापेमारी केली, ज्यानंतर दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
दरम्यान या प्रकरणी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी ही शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचे पार्टनर सदानंद कदम यांच्या ओळखीतून देण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आता माफीया सेना झाली आहे असं म्हणत सोमय्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला आहे.
दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. वाझेंच्या पाठीमागे शर्मांचा ब्रेन होता हे सर्वश्रुत होतं. अँटेलिया आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणातील अनेक बाबी प्रदीप शर्मा यांच्या अडचणीतून समोर येतील असं दरेकर म्हणाले.
दरम्यान या प्रकरणात NIA ने आतापर्यंत सचिन वाझे, रियाज काझी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली आहे. याव्यतिरीक्त महाराष्ट्र एटीएसनेही याआधी मनसुख हत्येचा तपास करताना माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदेला अटक केली होती. विनायक शिंदे हा लखनभय्या बनावट चकमक प्रकरणातला आरोपी असून तो पॅरोलवर बाहेर आला होता. याच लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांवरही कारवाई झाली होती. NIA ने दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी नियोजन करण्यात प्रदीप शर्मांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून आता कोणत्या नवीन बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT