ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ठाकरे गटातील ७ नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे ठाण्यातील नौपाडा उपविभाग प्रमुख दत्तात्रय उर्फ बाळा गवस यांच्या तक्रारीवरुन नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना (ठाकरे गट) नेते, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता बिर्जे, संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे आणि सूत्रसंचालक सचिन चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रा आणि जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषण करताना शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली.
मात्र यावेळी नेत्यांनी आणि समालोचकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले. यातून शिवसेना उद्धव ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट यांचेत तेढ निर्माण होईल असे भाषण केल्याचा आरोप करत शिंदे गटाचे नौपाडा उप विभाग प्रमुख दत्तात्रय उर्फ बाळा गवस यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, विविध प्रसार माध्यमांकडून महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेतील वक्ते म्हणून खासदार राजन विचारे, मी स्वतः, आमदार भास्कर जाधव खासदार विनायक राऊत, आणि आमच्या अनिताताई बिरजे यांच्यावरती 153 अ नुसार गुन्हे दाखल झाल्याचे कळतं आहे. मात्र अजूनही माझ्याकडे रीतसर याची प्रत मिळालेली नाही.
महाप्रबोधन यात्रेतील सगळी भाषण पब्लिक डोमेनमध्ये आहेत. ती तपासून घेता येतील मला खात्री आहे त्यातलं एकही वाक्य हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे आणि त्याचा सन्मान राखणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तरी सुद्धा 153 अ अर्थात चितावणीखोर वक्तव्य या सबबीखाली दाखल झालेला गुन्हा हा आमच्या महाप्रबोधन यात्रेच्या सुरुवातीचा शुभशकुन आहे असा आम्ही समजतो.
ADVERTISEMENT