नारायण राणे यांना जी अटक झाली त्या प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब आणि इतर अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. मंगळवारी जे काही झालं तो नारायण राणे यांच्यावरचा राग नव्हता तर मुख्यमंत्र्यांचा अज्ञान उघड झालं त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न शिवसेनेने थयथयाट करून केला असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. अनिल परब यांनी दुपारी 1 वाजण्याच्या आधी कोर्टात राणेंना जामीन अर्ज नाकारला जाणार आहे असं म्हणाले. कोर्टात तर अर्ज 4 वाजता गेला होता. मग अनिल परब यांना कसं समजलं? न्याय व्यवस्थेत ढवळाढवळ केली जाते आहे का? असाही प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
अनिल परब यांना हे सगळं प्रकरण आधीच माहित असणं, नारायण राणेंना अटक केलं जाणं, पोलिसांनी, आयपीएस अधिकारी यांनी दबाव टाकणं या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत, त्यामुळे आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत आहोत असंही शेलार यांनी म्हटलं आहे. नारायण राणेंच्या त्या वक्तव्याचं समर्थन आम्ही केलेलं नाही. तशी भूमिकाही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली होती. तरीही शिवसेनेने आंदोलन करून जाणीवपूर्वक राग दाखवला. तो राग नारायण राणेंच्या वाक्यापेक्षाही मुख्यमंत्र्यांचं अज्ञान उघडं पडलं ते झाकण्यासाठी शिवसेनेने आकांडतांडव केला.
काल जे घडलं त्यातून तीन मुद्दे समोर आले, अटकपूर्व जामीन फेटाळला जाणार आहे हे जामीन अर्ज करण्याआधीच अनिल परब यांना कसं कळलं? राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं आहे, त्यामध्ये शिवसेना आणि अनिल परब हस्तक्षेप करत आहेत आणि शरद पवारांना पसंत नाही हा दुसरा मुद्दा तर अधिकारी खोटं का बोलले हा तिसरा मुद्दा असे तीन मुद्दे समोर आले आहेत असंही शेलार यांनी स्पष्ट केलं.
Anil Parab: ‘पोलीस फोर्स वापरा’, परबांचा ‘तो’ Video व्हायरल, राणेंच्या अटकेतील इंटरेस्टिंग स्टोरी!
‘त्या’ व्हीडिओमध्ये अनिल परब नेमकं काय म्हणत आहेत?
1. अनिल परब यांना पहिला फोन:
अनिल परब: हॅलो.. हा बोला साहेब… हो.. अच्छा
नाही मी आता रत्नागिरीत आहे. मी विचारुन घेतो सीएम साहेबांना. हो.. फक्त मी ठरवतो.. मग देसाईंना तसं ब्रीफ करावं लागेल ना.
कोणाला सांगू ब्रीफ करायला.. मी डीजींना सांगतो. हो.. ठीक आहे. मी डीजींना सांगतो ताबडतोब. ठीक आहे. मी ताबडतोब बघतो काय करायचं ते. ओके.. ठीक आहे.
अनिल परब यांना दुसरा फोन:
अनिल परब: हॅलो काय करताय तुम्ही लोकं.. नाही पण ते करावं लागेल तुम्हा लोकांना.. नाही तुम्ही ते घेताय की नाही ताब्यामध्ये. ऑर्डर कसली मागतायेत ते? नाही नाही… ऑर्डर कसली मागतायेत ते? अहो कोर्टाने दोन्ही… हायकोर्ट ते येणार नाही कॉन्फिडेन्समध्ये.
हायकोर्ट आणि सेशन्स कोर्ट दोघांनीही नाकारला आहे त्यांचा जामीन.. पण घ्याना… पोलीस फोर्स वापरून करा ते. अहो वेळ लागणार तोपर्यंत कोर्टबाजी चालूच राहणार त्याची. ठीक आहे ओके.
यावेळी अनिल परब यांच्या उजव्या बाजूला आमदार भास्कर जाधव आणि डाव्या बाजूला मंत्री उदय सामंत हे बसले होते. फोन संपल्यानंतर कुणीतरी अनिल परब यांना असं सांगितलं की,
‘गुळवणीला घेतलंय वाटतंय ताब्यात त्यांना..’
अनिल परब: कोणाला?
‘नारायण राणेला’
अनिल परब.. भास्कर जाधव यांना उद्देशून: आता तो घरात बसलाय.. पोलिसांना घराला वेढा घातलाय. आता पोलीस आतमध्ये गेले तर पोलिसांची त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत धक्काबुक्की झाली. आता पोलीस ओढून काढतायेत एक-एकेला.. काढतायेत…
हे संभाषण संपवून अनिल परब हे पत्रकाराशी बोलू लागले. यावेळी पत्रकाराने परब यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
पत्रकार: राणेंना अटक झाली आहे का?
अनिल परब: मला याची पूर्ण माहिती मिळालेली नाहीए. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही त्यांना अटक झालेली आहे का ते.
पत्रकार: नाशिकमधील पथक आलं आहे का अटक करण्यासाठी?
अनिल परब: मी इथे तुमच्या समोर बसून आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथे बसून काय सांगू… चला.. धन्यवाद
ADVERTISEMENT