छगन भुजबळ यांची पंचहात्तरी नुकतीच झाली. त्याच औचित्याने छगन भुजबळ यांनी मुंबई तकशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेचे पहिले महापौर ही छगन भुजबळांची ओळख. तसंच त्यांची आणखी एक ओळख ती म्हणजे शिवसेनेतले पहिले बंडखोर. छगन भुजबळ यांच्या मागे ही ओळखही आहे. त्यावेळी त्यांना बाळासाहेब ठाकरे लखोबा लोखंडे म्हणत. त्यामागचं कारण काय होतं? हे छगन भुजबळ यांनीच आज मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं.
ADVERTISEMENT
शिवसेनेतले पहिले बंडखोर छगन भुजबळ
सध्या शिवसेना हा पक्ष चर्चेत आहे. कारण शिवसेनेचे दोन तुकडे पडले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड आहे. ४० आमदारांची साथ एकनाथ शिंदेंना लाभली आहे. तर अपक्ष १० आमदारही त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यांच्या या बंडामुळेच महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेत बंड होण्याची ही पहिली वेळ नाही. शिवसेनेतले पहिले बंडखोर छगन भुजबळ. त्यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांच्यावर तुफान टीका झाली होती. बाळासाहेब आपल्या भाषणात छगन भुजबळांचा उल्लेख अनेकदा लखोबा लोखंडे असा करायचे.
नागपूरच्या अधिवेशनात काय झालं?
नागपूरला अधिवेशन होतं. त्यावेळी बातमी फुटली. लोकसत्ता या की कुठल्या तरी वर्तमान पत्रात बातमी आली की छगन भुजबळ फुटणार. त्यावेळी प्रमोद नवलकर माझ्याकडे आले. मला म्हणाले बाळासाहेबांशी बोलून घ्या. मी त्यांना विचारलं कशासाठी? तर ते म्हणाले चला. मला वानखेडे साहेबांच्या मुलीच्या बंगल्यावर नेलं. तिथून प्रमोद नवलकरांनी बाळासाहेब ठाकरेंना फोन केला.
मला फोनवर बाळासाहेबांनी विचारलं, काय भुजबळ काय झालं? कुठे जाताय? तर मी साहेबांना म्हणालो काय बोलत आहात? मी कुठे जातो आहे. मी कुठेही जात नाही. हवं तर मुंबईत येतो. तर बाळासाहेब म्हणाले की ठीक आहे माझा विश्वास आहे. त्यानंतर एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी रात्री ३६ पैकी १८ आमदार फुटले. मधुकरराव चव्हाणांच्या बंगल्यावर सगळे उपस्थित झाले. तिकडे सगळे होतेच.
बाळासाहेब ठाकरे लखोबा लोखंडे का म्हणायचे?
त्यावेळी पक्ष सोडतो आहोत असं सांगितलं आणि शिवसेना अ गट स्थापन केला. बाळासाहेबांनी त्यानंतर मला लखोबा लोखंडे हे नाव ठेवलं. लखोबा लोखंडे हे तो मी नव्हेच या आचार्य अत्रेंच्या नाटकातलं पात्र आहे. प्रभाकर पणशीकरांनी ती भूमिका गाजवली आहे. मात्र मला बाळासाहेब ठाकरेंनी हे नाव ठेवलं कारण मी त्यांना शेवटपर्यंत सांगितलं होतं की मी जातच नाही. तरीही मी गेलो त्यामुळे माझा उल्लेख ते लखोबा लोखंडे असा करू लागले. त्यावरून मला ते नाव पडलं. लखोबा लोखंडे यांनी मला सारखं म्हणून तो प्रसिद्ध केला असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
मात्र नंतर बऱ्याच वर्षांनी बाळासाहेब ठाकरे यांना मी भेटलो. त्यांनीही सगळं विसरून मला माफ केलं. त्यानंतर मला त्यांनी कधीही नावं ठेवली नाही. तसंच मीही त्यांच्यावर कधीही टीका केली नाही असंही छगन भुजबळ यांनी मुलाखतीत सांगितलं.
ADVERTISEMENT