नुकतंच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत यांची नियुक्ती झाली आहे. याचं औचित्य साधून नागपूर खंडपीठाच्या बार कौन्सिलच्यावतीने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करत असताना लळीत भावूक झाल्याचे पहायला मिळाले. जुन्या आठवणींना उजाळा देताना ते एका कवितेचे वाक्य उच्चारत होते. यादरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी उपस्थित सर्व स्तब्ध झाल्याचे पहायला मिळाले.
ADVERTISEMENT
जुन्या आठवणींना उजाळा देताना अश्रू अनावर
सरन्यायाधीश म्हणाले की, नागपूरमध्ये बोलताना त्यांना त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण होत आहे. जेव्हा त्यांनी येथून वकिली व्यवसायाचा प्रवास सुरू केला होता. सरन्यायाधीशांनी रुडयार्ड किपलिंगच्या एका कवितेचा संदर्भ दिला, ज्यात म्हटले होते की जीवन एक प्रवास आहे. ही कविता ऐकवताना ते इतके भावूक झाले की भाषणादरम्यान काही क्षण त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना आवरल्या.
ज्ञान आणि क्षमतेनुसार सर्व काही करेन : सरन्यायाधीश
हायकोर्ट बार असोसिएशनने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना ते म्हणाले की,
मला एकच वचन द्यायचे आहे. मी माझ्या ज्ञान आणि क्षमतेनुसार सर्व काही करेन. सरन्यायाधीश म्हणाले, मी भाग्यवान आहे की मी वकिलांच्या कुटुंबातून आलो आहे. माझ्या आजोबांनी 1920 मध्ये सोलापूर जिल्ह्यातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तीन महिन्यांनंतर जेव्हा मी हे पद सोडेन, तेव्हा मला सर्वात जास्त आनंद होईल की माझी पूर्वीची आणि पुढची पिढी या व्यवसायात आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उदय लळीत यांची नियुक्ती ही ७४ दिवसांसाठी
लळीत यांची नियुक्ती ही ७४ दिवसांसाठी असणार आहे. देशाला गेल्या एप्रिलपासून ते नोव्हेंबरपर्यंत या ६ महिन्यात ३ सरन्यायाधीश मिळणार आहेत. न्यायमूर्ती लळीत नोव्हेंबरमध्ये निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे सरन्यायाधीश बनतील आणि ते सुद्धा मराठी आहेत. ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.
ADVERTISEMENT