एकीकडे जग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत असताना भारतीय सैन्य सीमेवर चिनी सैन्याचा सामना करत होतं. गलवान खोरं आणि डोकलाम सीमेवर भारत आणि चीनचं सैन्य समोरासमोर आलं होतं. चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताच्या १६ जवांनाना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. यानंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं होतं. या संघर्षानंतर तब्बल १ वर्षांनी चीनने अधिकृतरित्या गलवान खोऱ्यातील संघर्षात आमचे सैनिकही मारले गेल्याचं कबुल केलं आहे.
ADVERTISEMENT
चीन सरकारचं अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय सैन्यासोबत झालेल्या संघर्षात ५ चिनी सैनिकांना आपले प्राण गमावले आहेत. काराकोरम पर्वतरांगांत भारतीय सैन्यासोबत झालेल्या संघर्षात पाच चिनी सैनिकांनी आपले प्राण गमावले, चिनी सैन्याने या पाचही जवानांची नावं जाहीर केली आहेत. कमांडर क्युई फबाओ, चेन होंगुन, जियान गॉन्ग, जिओ सियुआन, वांग जुओरन या सैनिकांनी आपले प्राण गमावले असल्याचं चिनी सैनिकांनी जाहीर केलं आहे.
गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत झालेल्या संघर्षानंतर चीनने पहिल्यांदाच आपले सैनिक मारले गेल्याची कबुली दिली आहे. परंतू भारतीय लष्कराच्या मते चीन आपल्या सैनिकांचा आकडा लपवत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याच्या नॉर्दन कमांडचे चीफ लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “चीनी सैन्य ५० पेक्षा अधिक जवानांना आपल्या वाहनांमधून घेऊन जात होतं. पण ते सैनिक जखमी होते की मारले गेले होते हे सांगणं मुश्कील आहे. रशियन एजन्सीने आपल्या एका अहवालात ४५ चिनी सैनिक मारले गेल्याचं म्हटलंय, आमचाही अंदाज तेवढाच आहे.”
ADVERTISEMENT