शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलं. शिवसेनेचा नैसर्गिक मित्र भाजपच आहे आणि आपण त्यांच्यासोबतच गेलं पाहिजे ही भूमिका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी घेतली आहे. यानंतर घडलेलं सत्तानाट्य सगळ्या देशानं पाहिलं.
ADVERTISEMENT
आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनाही स्थान दिलं जाणार आहे. शिवसेनेत आता उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
शिवसेनेत उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे दोन गट, कार्यकर्ते संभ्रमात
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेना सोबत जोडले गेले. संघर्ष करत सेना वाढवली. त्यानंतर अनेक कार्यकर्ते निवडणुकीत विजय संपादन करून विधानसभेत गेले तर काही जण संसदेत गेले. मात्र कालांतराने यवतमाळ जिल्हा शिवसेनेत आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी असे दोन गट निर्माण झाले. त्यात कार्यकर्ते ही विभागले गेले. मग दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहायला लागले. त्यात नेत्याकडून ही बरेचवेळा दुजाभाव व्हायला लागला.
आता आमदार आणि खासदार हे दोन्ही नेते शिंदे गटात सहभागी झाले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून काम केले तर जिल्ह्यात शिंदे गटाला मोठा फायदा होऊ शकतो. संजय राठोड यांच्या कार्यशैलीने त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा आहे.
यवतमाळ जिल्हा शिवसेनेत दोन गट होते. हे सर्वश्रुत होते. आमदार संजय राठोड यांच्या प्रमाणेच खासदार भावना गवळी यांचा गट ही तेवढाच प्रभावशाली होता. त्यांना मानणारे कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना काम करतांना विरोधकांचा नाही तर आपल्याच अंतर्गत नेत्यांचा त्रास होत होता. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. काही कार्यकर्तेनी त्यांच्या वैक्तिक स्वार्थ पोटी नेत्यांना एकमेकांपासून वेगळे केले. आता या दोन्ही नेत्यांनी शिंदे गटात सामील होऊन एकदिलाने काम केले तर त्यांच्या कार्यकर्त्यांना आनंदच होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही नेते हे आता शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे इथे सेना खिळखिळी होईल असे काहींना वाटत होते. मात्र त्यांच्या सोबत त्यांचे लाभार्थी गेले. कडवड शिवसैनिक हा आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे दिसते. त्यामुळे जिल्ह्यातील या नेत्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही. उलट नव्या जोमाने, नव्या ताकदीने सेना पुढे येईल आणि जिल्ह्यात भगवा फडत राहील. असा आशावाद सैनिकांना आहे.
यवतमाळच्या राजकारणात आधीच दोन गट होते. अशात हे गट एकत्र येऊन काम करणार असतील तर चांगलीच गोष्ट आहे अशी भावना या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. अशात शिवसेनेत जे दोन गट पडले आहेत त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत हे वास्तव नाकारता येणार नाही. यवतमाळमध्ये जी अवस्था कार्यकर्त्यांची आहे तशीच काहीशी अवस्था राज्यभरातही आहे.
ADVERTISEMENT