शिवसेनेचे दोन दसरा मेळावे मुंबईत पार पडले. त्यानंतर आता धनुष्यबाणाची लढाई सुरू झाली आहे. धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळणार की उद्धव ठाकरेंकडेच राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिलं आहे. ज्यानुसार आता धनुष्यबाण आम्हाला मिळावा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार?
शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार? यासाठी म्हणजेच पक्षासाठी आणि धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्याच आधी एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण ही निशाणी मिळाली तर तो उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा धक्का मानला जाईल. जर धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलं तरीही उद्धव ठाकरेंसाठी धक्का असेल कारण दोन्ही शक्यतांमध्ये नुकसान उद्धव ठाकरेंचंच जास्त होणार आहे.
निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं तर काय?
निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं तर दोन्ही गटांना म्हणजेच ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला प्लान बी तयार ठेवावा लागेल. याचाच अर्थ दोन्ही गटांना पर्यायी चिन्ह तयार ठेवावं लागेल. हिंदुत्वाचे विचार, बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असा दावा आता दोन्ही गटांनी केला आहे. अशात एका पक्षात दोन गट पडल्याने चिन्ह आणि पक्ष कुणाकडे जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
बीकेसीमध्ये तलवारीचं पूजन तर शिवतीर्थावर गदेचं पूजन
बीकेसी मैदानावर तलवारीचं पूजन करण्यात आलं तर शिवाजी पार्क मैदानावर गदेचं पूजन करण्यात आलं. त्यामुळे शिवसेनचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलं तर दोन्ही गट तलवार आणि गदा ही चिन्हं घेऊ शकतात अशीही शक्यता वर्तवली जाते आहे.
२१ जून २०२२ ला शिवसेनेत उभी फूट
२१ जूनल २०२२ ला शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारालं आणि ४० आमदारांना सोबत घेऊन ते गुवाहाटीला गेले होते. शिवसेनेचं पक्ष नेतृत्व म्हणजेच उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी थेट आव्हान दिलं. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेत नाहीत हा ठपका एकनाथ शिंदे यांनी ठेवला. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. महाविकास आघाडीचं सरकार राज्यावर होतं जे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले.
धनुष्यबाण शिवसेनेला कधी मिळाला?
धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला १९८९ मध्ये मिळालं. शिवसेनेची पक्ष म्हणून नोंद केल्यानंतर हे चिन्ह शिवसेनेला मिळालं. आता या चिन्हाचं नेमकं काय होणार? हा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण हा उद्धव ठाकरेंकडेच राहिला तर उद्धव ठाकरेंसाठी तो मोठा दिलासा असणार आहे. तसंच शिंदे गटासाठी तो मोठा धक्का असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जर धनुष्यबाण गेला तर तो उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका असणार आहे. तर चिन्ह गोठवलं गेलं तरीही उद्धव ठाकरेंसाठी तो धक्का मानला जाईल. आता पक्ष आणि चिन्हाची लढाई निवडणूक आयोगासमोर रंगणार आहे त्यात काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT