हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आमच्याकडे १७० आमदारांचं बहुमत आहे. माझ्या डोक्यात आजही मुख्यमंत्रीपदाची हवा गेलेली नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. एवढंच नाही तर हाताच्या रेषा दाखवायची आम्हाला गरज नाही, मनगटात ताकद आहे ती दाखवायची ताकद आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही मंदिरात जायला घाबरत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांनाही उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
ज्योतिष पाहिल्याच्या चर्चेमुळे मुख्यमंत्र्यांवर टीका
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकारणावर ज्योतिषशास्त्राने कुरघोडी केली आहे अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला जाणार आहेत त्यामुळे विरोधक त्यांच्यावर कडाडून टीका करत आहेत. याबाबत आज एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं.
काय म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी?
बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात घडलेले मोठे-मोठे शिवसैनिक आज आपल्यासोबत आहेत. गजानन किर्तीकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ अशा ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला. सीमा प्रश्नावरून वातावरण तापलेलं असताना त्यावर आमचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार स्वस्थ बसणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणखी काय म्हणाले?
मोठमोठे वरिष्ठ शिवसैनिक का एकनाथ शिंदेंसारख्या छोट्या शिवसैनिकांसोबत येतात याचं आत्मचिंतन करा. हे राज्य सर्वसामान्य लोकांचं आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं आहे. आधी काय परिस्थिती होती? शहाजीबापू म्हणाले तसं कुणाला तोंड दाखवू शकत नव्हतो. हा प्रकल्प, तो प्रकल्प अशी आश्वासनं दिली गेली होती मात्र आता ती परिस्थिती नाही. प्रत्येक कॅबिनेटमध्ये आम्ही जलसिंचनाचे एक दोन तरी जलसिंचन प्रकल्प आम्ही पास करतो. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त या सगळ्यांसाठी आम्ही योग्य ते निर्णय घेतले. आपण नोकऱ्यांसाठी पदं निर्माण केली. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT