नागपूर : राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा गटनेते जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला. जयंत पाटील यांनी वापरलेल्या शब्दांमधून सभागृहाचा आणि अध्यक्षांचा अवमान झाला असल्याचं निरीक्षण अध्यक्ष नार्वेकर यांनी नोंदवलं.
ADVERTISEMENT
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा दावा करत सत्ताधारी पक्षांनी आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील वातावरण तापलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजन दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाची सोखल चौकशी व्हावी अशी मागणी शिंदे गट आणि भाजपमधील आमदारांकडून सातत्याने केली जात होती. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचं या प्रकरणात नाव घेण्यात आल्यानं त्यांना हा मोठा झटका मानला जात आहे.
याच मुद्द्यावर विधानसभेत चर्चा सुरु असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांना बोलू द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. या मुद्द्यावर सर्व विरोधक आक्रमक झालेले असताना अध्यक्ष नार्वेकरांनी मात्र त्यास नकार दिला. या सगळ्या गोंधळात जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका” असा शब्दप्रयोग केला. सत्ताधाऱ्यांकडून याच निर्लज्ज शब्दावर आक्षेप घेण्यात आला.
दिशा सालियन प्रकरणाची चौकशी होणार :
दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली. ज्यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी ही मागणी उचलून धरली. यावरुन दोनदा सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य असल्याचं म्हणत हे प्रकरण एसआयटीकडे देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असंही म्हटलं की, ज्यांच्याकडे यासंबंधी काही पुरावे असतील तर ते त्यांनी ते संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करावे. यामुळे आता हे संपूर प्रकरण नेमकं कोणतं वळणं घेतं याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT