कसं काय पाटील बरं आहे का? दिल्लीत काय घडलं आहे ते खरं आहे का? असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात जी नोकझोक पाहण्यास मिळाली त्याबाबत टोला लगावला आहे. पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी हा खुमासदार टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
सगळ्यांनी आपला करेक्ट कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. मात्र आपण ५० लोक सगळ्यांना पुरून उरलो. आमचं काय होणार? काय होणार याची चर्चा सुरू होती. आम्ही जे केलं ते धाडस करणं सोपं नव्हतं. एखादा ग्रामपंचायत सदस्यही निर्णय घ्यायला विचार करतो. मात्र इकडे ५० आमदारांनी निर्णय घेतला. हा जगातला मोठा इतिहास ठरला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय टोला लगावला ?
जयंत पाटील तुम्हाला ते गाणं माहित आहे ना? कसं काय पाटील बरं आहे का? काल दिल्लीत झालं ते खरं आहे का? दिल्लीत काय झालं? जयंतरावांनी दादांना बोलू दिलं नाही. त्यामुळे अजितदादा रागाने निघून गेले. त्यामुळे महाराष्ट्रात अजितदादांची दादागिरी चालते त्यामुळे जयंत पाटील यांनी त्यांना दिल्लीत बोलू दिलं नाही. दिल्लीत जयंत पाटील यांनी जे काही केलं त्याला काय म्हणायचं?असाही प्रश्न विचारत एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या व्हिडीओमध्ये दिसून येत असल्याप्रमाणे सुरुवातीला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, फौजिया खान अशा राज्यातील नेत्यांसोबत केरळ, लक्षद्वीप, हरयाणा, उत्तरप्रदेश अशा विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांची भाषण झाली. मात्र अजित पवार यांचे नाव भाषणासाठी पुकारण्यात येत नव्हते.
अखेरीस शरद पवार यांच्या भाषणापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी माईक हातात घेवून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दोन मिनिटांमध्ये मनोगत मांडण्याची विनंती केली. यावेळी कार्यकर्त्यांमधून अजित पवार यांना बोलायला द्या अशी मागणी करण्यात आली. तसेच अजित पवार यांच्या नावाच्या समर्थनाच्या घोषणाही देण्यात आल्या. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांनाच भाषण करण्यास सांगितले.
जयंत पाटील भाषणासाठी माईकसमोर उभे राहिल्यानंतरही अजित पवार यांच्याच नावाच्या घोषणा सुरुच होत्या. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, एक-एक स्टेशन येतं असतं. परंतु जयंत पाटील यांचे भाषण सुरु होताच अजित पवार व्यासपीठावरुन खाली आले आणि थेट सभागृहाच्या बाहेरच निघून गेले.
उद्धव ठाकरेंना टोला
२०१९ ला युतीला लोकांनी निवडून दिलं होतं. त्यावेळी जो नको तो प्रयोग करून लोकांशी, मतदारांशी विश्वासघात कुणी केला? लोकांना वाटत होतं की आपलं युतीचं सरकार यावं. ते आलं का? तर नाही, उलट हा प्रयोग केला गेला. जो मान्य करण्यासारखाच नव्हता. त्यामुळे आम्ही भाजपसोबत गेलो असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा झाली. एकनाथ शिंदे यांच्या या सभेपूर्वी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपचा आधार घेऊन विरोधकांनी शिंदेंवर निशाणा साधला. पैसे देऊन सभेसाठी गर्दी जमवली, असल्याचं म्हटलं गेलं. विरोधकांच्या आरोपाला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं.
ADVERTISEMENT