कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज (30 जुलै) कोल्हापूरच्या शाहूपुरी भागात अचानक समोरासमोर आले. यामुळे भर रस्त्यात थांबूनच दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी कोल्हापूरच्या पूर परिस्थितीबाबत चर्चा केली. कोल्हापूरमधील पुराने जिल्ह्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. अशावेळी मुख्यमंत्री स्वत: कोल्हपुरात पाहणी दौरा करण्यासाठी आले आहेत.
ADVERTISEMENT
तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील दोन दिवसांपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. अशातच हे दोन्ही दिग्गज कोल्हापूरमध्ये एकमेकांच्या समोर आल्याने आता याविषयी बरीच चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्याची पाहणी केली आणि त्यानंतर ते कोल्हापुरच्या शहरी भागात पाहणी करण्यासाठी वळाले. याचवेळी शाहपुरी भागात देवेंद्र फडणवीस हे देखील पूरग्रस्तांशी संवाद साधत होते. फडणवीसांचा सगळा ताफा इथे असताना त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील ताफा इथे आला. त्यामुळे या संपूर्ण परिसरात बरीच वर्दळ पाहायला मिळाली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना रस्त्यात थांबवून त्यांच्याशी काही मिनिटं चर्चा देखील केली. फडणवीस हे पूरपरिस्थिती जाणून घेत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्याचविषयी त्यांच्या संवाद साधला असण्याचा शक्यता आहे.
कोल्हापुरातल्या शाहूपुरी भागाला पुराचा मोठा फटका बसला होता. या भागात तब्बल 8 फूटापर्यंत पाणी साचलं होतं. तसंच आतापर्यंत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस हे या भागात पोहचले तेव्हा येथील नागरिकांनी त्यांना गाराडा घालून याबाबत प्रश्न देखील विचारले. असं असताना त्याच भागात मुख्यमंत्र्यांचा देखील ताफा आला. ज्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी आपआपसात चर्चा देखील केली.
मुख्यमंत्री कोल्हापुरात कुठे-कुठे करणार पाहणी?
शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील पुराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री हे शाहूपूरी 6वी गल्ली, कोल्हापूर नाईक अॅण्ड कंपनी या ठिकाणी रवाना झाले. इथेच त्यांची फडणवीसांसोबत भेट झाली. या भागातील पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री हे पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पूल रस्ता या भागाची देखील पाहणी करणार आहेत. कारण पुरामुळे या भागात देखील प्रचंड नुकसान झालं आहे. साधारण दोन तास मुख्यमंत्री स्वत: वेगवेगळ्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
CM Uddhav Thackeray Kolhapur: मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर, थेट लोकांमध्ये जाऊन ऐकतायेत त्यांची गाऱ्हाणी
या पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोल्हापूरमधील स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत. या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याला कशा प्रकारे मदत केली जाऊ शकते याबाबत मुख्यमंत्री महत्त्वाची माहिती देऊ शकतात.
ADVERTISEMENT