माहुल आणि विक्रोळी परिसरात भुस्खलनामुळे घराची भिंत कोसळून झालेल्या अपघातामुळे आज मुंबईत मोठी जिवीतहानी झाली. दोन्ही घटनांमध्ये मिळून २० पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची दखल घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
याचसोबत या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. चेंबूर भागातील माहुल परिसरात घरावर भिंत कोसळून १७ तर विक्रोळी परिसरात पावसामुळे झोपड्या कोसळून ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
या घटनेची राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनीही दखल घेतली असून पंतप्रधान कार्यालयाने या घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.
सकाळी साडेसहा वाजल्याच्या दरम्यान माहुल भारात घडलेल्या या घटनेबद्दलची माहिती मिळताच, अग्नीशमन दल आणि NDRF ची टीम घटनास्थळी पोहचली. यात जखमी झालेल्या १९ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. किरकोळ दुखापत झालेल्या रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात येत आहे. परंतू या घटनेनंतर मुंबईतील दरड क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या जीवाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
Mahul Landslide : भिंत खचली, चूल विझली! जेव्हा पाऊस काळ बनून येतो..
दुसरीकडे, विक्रोळी परिसरातही ४-५ झोपड्या पडून जिवीतहानीची बातमी समोर येते आहे. विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यनगर भागात भूस्खळनामुळे ४-५ झोपड्या पडून सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मध्यरात्री पावणेतीन वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेत जखमींना राजावाडी रुग्णालयात आणलं असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT