काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना कोरोना काळात राजकारण करु नका. प्रत्येक गोष्टीचे बॅनर आणि झेंडे लावण्याची गरज नाही असं सुनावलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही या सल्ल्याबद्दल नितीन गडकरींचे आभार मानत, बरं झालं सर्वांचे कान टोचलेत असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
धाराशिव साखर कारखान्याने करुन दाखवलं ! इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीची चाचणी यशस्वी
धाराशिव साखर कारखान्यात इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि गडकरी सहभागी झाले होते. “नितीनजी धन्यवाद, बरं झालं काही दिवसांपूर्वी तुम्ही सर्वांचे कान टोचलेत. मी देखील सुरुवातीपासून सांगतो आहे की कोरोनाच्या काळात राजकारण आणू नका. उलट या कामात सर्वांनी एकत्र यायला हवं. आधी जीव महत्वाचा आहे, हा काळ लोटला की आपल्याला राजकारण करायचच आहे.” उद्धव ठाकरेंनी आभार मानल्यानंतर गडकरींनीही गालातल्या गालात हसून प्रतिसाद दिला.
काय म्हणाले होते नितीन गडकरी?
“तुम्ही कोरोनाची परिस्थिती जेवढी हलक्यात घेताय तेवढी ती नाहीये. आता सर्वांनी काळजी घेणं गरजेची आहे. रस्त्याची, पुलाची जी कोणती काम असतील ती घरातून करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर करा. पार्टीची काम महत्वाची आहेतच…पण जीव वाचला तर पुढे काही कराल ना. महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या काळात राजकारण करु नका. केलेल्या प्रत्येक कामाचे बोर्ड आणि झेंडे लावण्याची गरज नाही. लोकांना ते फारसं आवडत नाही. तुम्ही जे कराल त्याचं क्रेडीट तुम्हाला मिळणारच आहे. सध्याच्या घडीला मीडिया स्ट्राँग आहे की तुमचं काम पोहचतं. पण एखादा ऑक्सिजन सिलेंडर द्यायचा आणि ४-४ वेळा त्याचे फोटो पाठवायचे असं करु नका. तुम्ही करत असलेल्या सेवाकामाची इतरांना माहिती मिळणं इथपर्यंत ठीक आहे पण त्याचा बागुलबूवा करु नका”, असं म्हणत गडकरींनी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना उपदेशाचा डोस पाजला होता.
अनेक जण भावनेच्या भरात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन काम करतात तसं करु नका. पहिले स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या, त्यानंतर तुमच्या घरातली आर्थिक व्यवस्था योग्य राहिल याची काळजी घ्या आणि त्यानंतर समाजकामाला प्राधान्य द्या असं गडकरींनी सांगितलं. गेल्या काही काळात आपण अनेक कार्यकर्ते कोरोनामुळे गमावले आहेत, आता आपल्याला कार्यकर्ते गमावून चालणार नाही असं म्हणत गडकरींनी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला परिस्थितीचं भान राखून वागण्याचा सल्ला दिला होता.
ADVERTISEMENT