महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुणाला भावासारखे, मुलासारखे वाटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येकाला कुटुंबप्रमुखांसारखं वाटणं हे त्यांचं यश आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.भविष्यात ते देशाचं नेतृत्वही करू शकतात असंही संजय राऊत म्हणाले. याबाबत जेव्हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आलं तेव्हा शरद पवारांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील पूरस्थिती आणि पूरग्रस्त लोकांना काय मदत केली जाणार आहे हे सांगितलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशिवाय इतर कुणी पूर आलेल्या ठिकाणी किंवा समस्या असलेल्या ठिकाणी भेटी देऊ नये असा सल्ला देत त्या ठिकाणी दौरे करणाऱ्या नेत्यांनाही सुनावलं आहे. याच पत्रकार परिषदेत जेव्हा शरद पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे नेते होऊ शकतात, संजय राऊत यांनी तसंच वक्तव्य केलं आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, ‘आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल तर आनंदच आहे’
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
‘आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. कोरोना, पूरस्थिती, राज्यावर आलेलं संकट यामुळे त्यांनी वाढदिवस साजरा करू नका असं आवाहन केलं. ते राज्याचं कुशल नेतृत्व करत आहेत. मी त्यांना गेल्या 40 हून अधिक वर्षांपासून ओळखतो. मुख्यमंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत. मात्र या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्रालाही अपेक्षा आहेत. आजच्या दिवशी मी माझं म्हणणं पुन्हा एकदा अधोरेखित करतो. राष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संमयी, प्रखर, राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी नेतृत्वाची भविष्यात गरज लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम आहे आणि ते नेतृत्व करतील याची मला खात्री आहे’ असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT