उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यानंतर काँग्रेस खासदार आणि राहुल गांधी यांच्या टीममधले विश्वासू सदस्य जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे त्याआधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. जितिन प्रसाद यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशच्या राजकारणात जितिन प्रसाद यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे असं वक्तव्य पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
जितिन प्रसाद यांनी काय म्हटलं आहे?
सध्या आपला देश अनेक आव्हानांचा सामना करतो आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी जर देशात कुठला सक्षम पक्ष असेल तर तो भाजप आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची उत्तम प्रकारे सेवा करत आहेत. काँग्रेस या पक्षात असताना मी आपल्याच लोकांची सेवा करू शकत नव्हतो त्यामुळे मी हा पक्ष सोडला. आता भाजपच्या माध्यमातून मला लोकांची सेवा करता येईल असं जितिन प्रसाद यांनी म्हटलं आहे.
जितिन प्रसाद गेल्या काही दिवसांपासून पार्टी हायकमांडशी नाराज होते. काँग्रेसच्या बड्या ब्राह्मण चेहऱ्यांपैकी जितिन प्रसाद हे एक होते. उत्तर प्रदेशातल्या काँग्रेसच्या काही दिग्गजांना जितिन प्रसाद यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. अखेर आज जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात भाजपने आपली राजकीय गणितं जुळवण्यास सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेशातला एक मोठा ब्राह्मण वर्ग भाजपसोबत नाराज आहे. खास करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत या वर्गाची नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसच्या जितिन प्रसाद यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. जितिन प्रसाद यांना भाजपमध्ये घेऊन एक प्रकारे नाराज वर्गाला भाजपने संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
जितिन प्रसाद हे भाजपमध्ये येताच ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही त्यांचं स्वागत केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्त्वात जितिन प्रसाद चांगलं कम करतील असा मला विश्वास वाटतो असं ज्योतिरादित्य यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT