जरा संयम बाळगा, मोदींनंतर भाजप पुन्हा…; काँग्रेस नेत्यांने जी-२३ गटावर साधला निशाणा

मुंबई तक

• 01:19 PM • 18 Mar 2022

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेससमोर अंतर्गत बंडाळी थोपवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. जी २३ गटातील काँग्रेसच्या नेत्यांनी थेट विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवरून पक्षनेतृत्वालाच निशाणा बनवलं आहे. या नेत्यांशी सध्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडून चर्चा केली जात असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी संयम बाळगण्याचा सल्ला देतानाच खडे बोलही सुनावले आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेससमोर अंतर्गत बंडाळी थोपवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. जी २३ गटातील काँग्रेसच्या नेत्यांनी थेट विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवरून पक्षनेतृत्वालाच निशाणा बनवलं आहे. या नेत्यांशी सध्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडून चर्चा केली जात असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी संयम बाळगण्याचा सल्ला देतानाच खडे बोलही सुनावले आहेत.

हे वाचलं का?

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर काँग्रेसमधील जी २३ गट पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. गेल्या दोन दिवस जी २३ गटातील नेत्यांच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी या बैठका झाल्या. दरम्यान, या बैठकीनंतर आता गुलाम नबी आझाद सोनिया गांधींशी चर्चा करणार आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी जी२३ गटातील काँग्रेस नेत्यांना धीर बाळगण्याचा सल्ला देत फटकारलं आहे. सत्तेत नाही म्हणून नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घाबरून जाता कामा नये. भाजप आणि इतर पक्ष येतील आणि जातील, मात्र काँग्रेस भविष्यातही राहिल.

काय म्हणाले वीरप्पा मोईली?

“सोनिया गांधी यांना पक्षामध्ये सुधारणा करायच्या आहेत, पण त्यांच्या आजूबाजूची लोक त्या होऊ देत नाहीत. जी २३ (G-23) मधील नेते पक्षाच्या नेतृत्वावरच टीका करत आहेत आणि काँग्रेसला कुमकुवत करत आहेत.”

“भाजप नेहमीच अशी राहणार नाही. नरेंद्र मोदी यांचं राजकीय कारकीर्द संपताच भाजपत पुन्हा फूट पडेल”, असं विधान मोईली यांनी केलं.

काँग्रेससमोर बंड रोखण्याचं आव्हान; सोनिया गांधी करणार गुलाम नबी आझादांसोबत चर्चा

“आपण फक्त सत्तेत नाही, यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घाबरून जायला नको. भाजप आणि इतर राजकीय पक्ष येतील आणि जातीलही. ही काँग्रेस आहे जी भविष्यातही राहील. आपण सर्वसामान्यांबद्दल कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि आशा सोडली नाही पाहिजे,” असं मोईली यांनी म्हटलं आहे.

“सोनिया गांधी प्रत्येकासोबत चर्चा करण्यास तयार”

जी २३ गटाच्या नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधल्यानंतर पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी बंडखोरीचा सूर लावणाऱ्या नेत्यांना फटकारलं आहे. त्याचबरोबर सर्वांशी चर्चा करण्यास सोनिया गांधी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे.

“सोनिया गांधी प्रत्येक काँग्रेस नेत्यासोबत चर्चा करण्यास तयार आहे. जेव्हा एकत्र लढण्याची गरज आहे, तेव्हा काही राजकीय नेते पक्षाच्या विरोधात बोलत आहेत. त्यांचं म्हणणं योग्य आहे, तर ते सोनिया गांधींशी चर्चा करत नाही. जेव्हा या नेत्यांना यूपीए सरकारच्या काळात मंत्री बनवलं गेलं, तेव्हा लोकशाही पद्धतीने मंत्रिपद दिली गेली पाहिजे, असं हे नेते म्हणाले होते का? पक्ष उतार-चढावातून जातो, याचा अर्थ असा नाही की बंडखोरीचा पावित्रा घ्यावा,” असं ते म्हणालेले आहेत.

    follow whatsapp