राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. त्यावरून बरंच राजकीय वादंग झालं. राहुल गांधींनी केलेल्या विधानावर भाष्य करताना राज ठाकरेंनी त्यांना म्हैसूर सॅण्डल सोप म्हटलं. राज यांनी केलेल्या टीकेला आता काँग्रेसनंही उत्तर दिलंय. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसनं साबणाची जाहिरातच शेअर केलीये.
ADVERTISEMENT
मनसे गटाध्यक्षांचा मेळावा रविवारी गोरेगावमधल्या नेस्को मैदानात पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी हिंदुत्वापासून ते सावरकर-नेहरू पर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. म्हैसूर सॅण्डल सोप म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींची खिल्ली उडवली. आर.डी बर्मन बोलताहेत म्हणत बोलण्याची नक्कलही केली.
‘तो म्हैसूर सॅण्डल सोप महाराष्ट्रात येऊन गेलाय. राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत’, म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींना लक्ष्य केलं. यावर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय आणि म्हटलंय की, ‘मनसे अध्यक्ष म्हणजे “ओके” साबण कारण…’
राज्यपाल, भाजप, काँग्रेस, उद्धव ठाकरे ते शिंदे गट : राज यांनी घेतला ‘ठाकरे’ शैलीत समाचार
राज ठाकरेंच्या भाषणावर काँग्रेस नेते सचिन सावंत काय म्हणाले?
सचिन सावंत यांनी एका व्हिडीओतून राज ठाकरेंनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला उत्तर दिलंय. ‘भाजपनं मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलं आहे, यावर भाषणानं शिक्कामोर्तब झालं आहे. 16 वर्षात त्यांनी ज्या भूमिका बदलल्या त्याला जनतेचा पाठिंबा मिळत नाही. जनतेला त्या तर्कसंगत वाटत नाहीत. राजकीय यश मिळत नाहीत, याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा ते दुसऱ्यांवर आणि माध्यमांवर खापर फोडत आहेत.’
‘आता तर ते असं म्हणतात की, मनसेचं कार्य जनतेच्या विस्मृतीत जाण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचं ते म्हणतात. जनतेची स्मृती निर्धारित करता येऊ शकते, असा जावई शोध हे लावत आहेत,’ असं म्हणत सचिन सावंतांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
मनसेने आपला मेंदू भाजपकडे गहाण ठेवलाय -सचिन सावंत
‘मनसेनं आपला मेंदू भाजपकडे गहाण ठेवला की काय अशी शंका यावी, असं त्यांचं (राज ठाकरे) भाषण होतं. जनतेला ब्लू प्रिंट देणार असं आश्वासन देऊन, ती अजून देता आली नाही. ते स्ट्रॅटजीबद्दल बोलतात ही विरोधाभासी गोष्ट आहे. ज्यांचा मेंदू भाजपकडे गहाण आहे त्यांनी राहुल गांधी यांच्या बुद्धीमत्तेबद्दल, लायकीवर बोलावं, ही दुर्दैवाची आणि हास्यास्पद गोष्ट आहे”, असा घणाघात सावंतांनी केला.
“महाराष्ट्रातील प्रवक्ते जी भाषा बोलतात त्यामुळं राजकारणाचा स्तरखाली आला आहे असं ते (राज ठाकरे) म्हणतात. ज्या पद्धतीची भाषा राहुल गांधींसाठी त्यांनी वापरली, त्यावरुन प्रवक्त्यांचे मेरुमणी राज ठाकरे आहेत हे दिसतं”, असं म्हणत सचिन सावंतांनी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT