महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत राज्यातील देवस्थान आणि महामंडळाच्या वाटपाबद्दल निर्णय झाला आहे. ज्यात शिर्डी संस्थानाचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचं अध्यक्षपद काँग्रेसकडे गेलं आहे. राष्ट्रवादीने शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी आमदार आशुतोष काळे यांना संधी दिली आहे. दुसरीकडे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना प्रणिती शिंदेंना मंत्रीपदावर संधी मिळेल असं वाटत होतं. परंतू या मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागली नाही. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. असं झाल्यास प्रणिती शिंदे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरतील. काँग्रेस पक्षाकडूनही या पदासाठी मुंबईत लॉबिंगला सुरुवात झाली आहे.
सध्या अस्तित्वात असलेली मंदिर समिती ही महायुती सरकारच्या काळात अस्तित्वात आलेली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे कराडचे डॉ.अतुल भोसले यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आली होती. 2019 च्या निवडणूकी दरम्यान त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले .दीड वर्षानंतर आता नवीन समिती स्थापन होणार आहे.आणि पंढरपुर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद हे काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर अध्यक्ष पदा साठी आ.प्रणिती शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT