काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी आज संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सहा महिला खासदारांसोबत एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे. कारण इंटरनेटवर या फोटोबाबत अनेक नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ, मिमी चक्रवर्ती, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासहीत सहा महिला खासदारांसोबत शशि थरूर यांनी फोटो काढला आहे. हा फोटो त्यांनी ट्विट केल्यापासून चांगलाच व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी हा फोटो ट्विट केला आणि म्हणाले की, ‘कोण म्हणतं लोकसभेत काम करणं आकर्षक नसतं? आज सकाळी माझ्या सहा सहकारी खासदारांसह’ असं म्हणत थरूर यांनी हा फोटो ट्विट केला आहे. यामध्ये खासदार परणीत कौर, जोथिमणी, टीएमसी खासदार नुसरत जहाँ आणि मिमी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि डीएमकेच्या खासदार थमिजाची थंगापांडियन दिसत आहेत.
ट्विटरवर यावरून शशि थरूर यांना ट्रोल केलं जातं आहे. या फोटोवर कमेंट करत वकील करूणा नंदी म्हणाल्या की शशि थरूर हे निवडून आलेल्या नेत्यांना त्यांच्या लुकपर्यंत सीमित ठेवू इच्छितात. त्यामुळेच त्यांनी स्वतःला या फोटोत केंद्रस्थानी ठेवलं आहे. मोनिका नावाची एक युजर म्हणते, ‘मला ही खात्री आहे की या खुलेआम सेक्सीजमवर डावे उदारमतवादी काहीही बोलणार नाही. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी जेव्हा फाटक्या जीन्सबाबत वक्तव्य केलं होतं तेव्हा प्रतिक्या आल्या होत्या. आता कुणी काही बोलणार नाही.’
आलीशा रहमान नावाची एक युजर म्हणते, हे चांगलं आहे. लोकसभेत महिलांना फक्त ग्लॅमर वाढवण्यासाठी निवडलं जातं. हेच कारण असल्याने काही पक्ष हे महिला आरक्षण विधेयकावर जोर देत आहेत. बकवास! विद्या नावाची एक युजर म्हणते की महिला लोकसभेच्या आकर्षणासाठी नाहीत, त्या तिथल्या सजावटीची वस्तू नाहीत. त्या खासदार आहेत, तुम्ही त्यांचा अपमान करत आहात.
ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाल्यानंतर थरूर यांनी नेटकऱ्यांची माफी मागितली आहे. हा फोटो घेण्यासाठी महिला खासदारच आग्रही होत्या. गंमत म्हणून हा फोटो काढला आहे निव्वळ गंमत म्हणूनच मी तो ट्विट केला. मात्र यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याचा खेद वाटतो. मात्र अशा प्रकारच्या सौहार्दपूर्ण वातावरणातच मला काम करायला आवडतं.
ADVERTISEMENT