काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस नेत्यांसोबत बैठका सुरू आहेत. या बैठकीत उपस्थित असलेल्या आणि सोनिया यांना भेटायला आलेल्या काही काँग्रेस नेत्यांनाही कोरोना झाल्याची माहिती सुरजेवाला यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
सोनिया गांधी यांना सौम्य स्वरूपाचा ताप आला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल मिळाला असून त्या पॉझिटिव्ह आहेत असं कळलं आहे. ही माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. एवढंच नाही तर सोनिया गांधी यांनी स्वतःला आयोसेलेट केलं आहे. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. काही दिवसातच त्या बऱ्या होतील असा विश्वासही सुरजेवाला यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका गांधी या सोनियांसोबत होत्या. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे ही माहिती मिळताच प्रियांका गांधी यांनी त्यांचा लखनऊ दौरा रद्द केला आहे. त्या दिल्लीला परतल्या आहेत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र भाजपकडून हे सूडाचं राजकारण केलं जात आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. या संदर्भात रणदीप सुरजेवाला आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती. आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही सामना करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
ADVERTISEMENT