अमरावतीत गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या काळात अमरावतीचा जवळपास ६० टक्के भाग हा कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला होता. काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका भागात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने आता अमरावतीच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. एकीकडे महापालिका हद्दीतील रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाची चिंता कायम आहे.
ADVERTISEMENT
मंगळवारी अमरावती जिल्ह्यात १ हजार २२३ नवीन रुग्ण सापडून आले होते. यापैकी महापालिका क्षेत्रात २४९ तर ग्रामीण भागात तब्बल ९७४ रुग्ण आढळून आले. अमरावतीत शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण ८७ टक्के इतक आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यातील हॉटस्पॉट ठरणारी ११० गावं सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. याचसोबत तालुकास्तरावर तहसीलदार व आरोग्य अधिकाऱ्यांना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. याचसोबत गरजेच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जिवनावश्यक वस्तूंव्यतिरीक्त अन्य दुकानं उघडली जात असल्याच्या काही तक्रारी समोर आल्या होत्या. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला यात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नियमांचं काटेकोरपणे पालन न होता दुकानं उघडी ठेवली जात असून त्यावर गर्दी होताना दिसत आहे. याचमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे. अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत नागपूर-वर्धा आणि मध्य प्रदेशच्या जवळ असणाऱ्या गावांमध्ये कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढत असल्याचं पहायला मिळतंय. ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कोविड केअर सेंटर उभारणीपासून ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवण्यासाठी उपाययोजना सुरु केल्यात. सध्या ११० गावं सील करण्यात आली असून येत्या काळात रुग्णसंख्या वाढल्यास आणखी गावं सील केली जातील असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT