गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात सातत्याने वाढ होत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे स्थानिक प्रशासनासमोरचे धाबे दणाणले आहेत. गेल्या २४ तासांत शहरात २ हजार २६२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. ७ जणांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झालेला आहे.
ADVERTISEMENT
भंडाऱ्यात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू
खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरमध्ये १५ मार्चपासून २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सोयी-सुविधा बंद ठेवण्यात येणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे नागपूर शहरासह जिल्ह्याच्या सीमांवरतीही नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास स्थानिक प्रशासनाला आणखी कठोर निर्बंध लावावे लागणार आहेत.
दरम्यान नागपूरच्या लगत असलेल्या भंडारा जिल्ह्यातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने भंडाऱ्यात आजपासून संचारबंदी लागू केली आहे. भंडारा जिल्ह्यात पुढील सूचना मिळेपर्यंत रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. आज रात्रीपासूनच हा निर्णय भंडारा जिल्ह्यात लागू होणार आहे.
ADVERTISEMENT