लंडन: देशात आणि जगात ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. भारतातही आता ओमिक्रॉन व्हेरिएंट झपाट्याने पसरत असल्याचं दिसतं आहे. सध्या भारतात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 87 वर पोहोचली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारची चिंता वाढली आहे. दुसरीकडे ब्रिटन-अमेरिकेतही रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या नोंदवली जात आहेत. तिथेही ओमिक्रॉनचा कहर स्पष्टपणे दिसतो आहे. ब्रिटनमध्ये गुरुवारी (16 डिसेंबर) एका दिवसात 88 हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत.
ADVERTISEMENT
Omicron व्हेरिएंट समोर आल्यानंतर युरोपातील आणि विशेषत: ब्रिटनमधील परिस्थिती आणखी वाईट होत चालली आहे. तेथे पुन्हा एकदा एका दिवसात रेकॉर्डब्रेक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
यूकेमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 88,376 रुग्ण सापडले आहेत. आदल्या दिवसाच्या तुलनेत इथे तब्बल दहा हजार अधिक रुग्ण सापडले आहेत. चिंतेची बाब ही आहे की आता यातील बहुतेक रुग्ण हे Omicron व्हेरिएंटने संक्रमित झालेले आहेत.
ब्रिटन सरकारने सांगितले की, कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गुरुवारी ब्रिटनमध्ये 88,376 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी ब्रिटनमध्ये 78,610 रुग्ण सापडले होते. तर गुरुवारी यात दहा हजाराने वाढ झाली आहे. बुधवार आणि गुरुवारमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या तब्बल 146 लोकांचा मृत्यू झाल्याची माहितीही ब्रिटन सरकारने दिली आहे.
‘अमेरिकेत ओमिक्रॉन वेगाने पसरण्याची भीती’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी इशारा दिला आहे की, कोरोना व्हायरसचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा अमेरिकेत अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे. कारण, हिवाळ्यात होणाऱ्या आजारांसह लसीकरण न केलेल्यांना या व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी असंही म्हटलं आहे की, आता बूस्टर डोस घेण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत अमेरिकेतील 36 राज्यांमध्ये ओमिक्रॉनची एंट्री झाली आहे.
दक्षिण अफ्रिकेतही ओमिक्रॉनने वाढवलीय चिंता
दुसरीकडे बुधवारी दक्षिण आफ्रिकेत देखील 26900 हून अधिक रुग्ण सापडले होते. तर गुरुवारी येथे 24,700 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. ज्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याचे स्पष्टपणे संकेत मिळत आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, काही आठवड्यात मृत्यू दर देखीव वाढू शकतो.
ओमिक्रॉनचा कहर.. ब्रिटनमध्ये एका दिवसात तब्बल 78,610 नवे रुग्ण, भारतात येऊ शकते लॉकडाऊनची वेळ?
भारतातील 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव
भारतातील ओमिक्रॉन व्हेरिएंटची वाढती रुग्णसंख्या ही आता चिंतेची बाब ठरत आहेत. भारतातील तब्बल 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. भारतात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 32 रुग्ण सापडले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत 10 रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटने बाधित एकूण 87 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.
ADVERTISEMENT