–धनंजय साबळे, अकोला
ADVERTISEMENT
राज्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त होत असतानाच अकोल्यात वेगळीच घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असलेल्या या प्रेमीयुगुलाला तरुणांच्या टोळकल्याने मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
अकोल्यातील उरल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गायगा पेट्रोल डेपो जवळ प्रेमीयुगुलाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. प्रेमी युगुलाला मारहाण केल्याचा घटनाक्रम एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणमे गायगा पेट्रोल डेपोजवळ एका प्रेमीयुगुलाला तरुणांच्या टोळक्याने अडवलं. ओळख लपवण्यासाठी मुलासोबत असलेल्या मुलीने बुरखा परिधान केलेला होता. बुरखा घालून ती मुलासोबत जात असतानाच तरुणांच्या एका टोळक्याने त्यांना अडवलं आणि मुलाला मारहाण करण्यास सुरूवात केली.
भयंकर! माथेरानमध्ये सापडला महिलेचा शिर नसलेला मृतदेह
तरुणांचं टोळकं तरुणीसोबतच्या तरुणाला बेदम मारहाण करत होतं. यावेळी ती तरुणी हात जोडून मारहाण न करण्याची विनवणी करत होती. मात्र, टोळक्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी तरुणाला मारहाण करणं सुरूच ठेवलं. त्यानंतर मुलगी मुस्लीम नसल्याचं लक्षात आल्यानंतर काही लोकांनी मध्यस्थी करुन टोळक्याला थांबवलं.
मात्र, त्यानंतर टोळक्यातील काही जणांनी मुस्लीम नाहीस, मग बुरखा का घातला म्हणून तिला धारेवर धरलं. इतकंच नाही, तर त्यांनी तरुणीला तिथेच बुरखा काढून टाकायला भाग पाडलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेतली.
कल्याण : पत्नी व मुलावर हल्ला, स्वतःला संपवलं; घरातील दृश्य पाहून सोसायटीचे सदस्यही हादरले
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सूचनेप्रमाणे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या टोळक्यातील दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत मारहाण करण्यात आलेली मुलगा व मुलगी पोलिसांत आलेले नाहीत, असं पोलिसांनी सांगितलं. मात्र, पोलिसांनी स्यूमोटोनुसार कारवाई करत दोघांना अटक केलं आहे, अशी माहिती उरल पोलीस स्टेशनचे प्रमुख आनंदराव वाडेकर यांनी दिली.
ADVERTISEMENT