नागपूर: लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सरपंचांकडूनच मारहाण, Video व्हायरल

मुंबई तक

• 09:00 AM • 05 Jan 2022

योगेश पांडे, नागपूर: कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आता देशभरात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. मात्र, लसीकरण का करता? असा सवाल विचारत थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा एक धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील भिष्णूर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या खंडाळा गावात घडला आहे. या प्रकरणातील धक्कादायक […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, नागपूर: कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आता देशभरात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. मात्र, लसीकरण का करता? असा सवाल विचारत थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा एक धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील भिष्णूर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या खंडाळा गावात घडला आहे.

हे वाचलं का?

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे खंडाळा गावाचे सरपंच रुपेश मुंदाफळे यांनीच स्वत: आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे. आता या मारहाणीचा एक व्हीडिओ देखील समोर आला आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी लसीकरण मोहीम ही अत्यंत गरजेची बाब आहे. त्यामुळेच भारत सरकारने स्वत: हा उपक्रम हाती घेतला आहे. गावोगावी लसीकरणासाठी पंचायत समिती आणि खंडविकास अधिकारी परवानगी देत असतात. मात्र, भारत सरकारने लसीकरण मोहीम राबवा असे आदेश दिल्यानंतर इतरांच्या होकाराची यासाठी आवश्यकता नसते.

असे असतानासुद्धा खंडाळा गावाचे सरपंच रुपेश मुंदाफळे यांनी कोणाच्या परवानगीने तुम्ही शिबिर आयोजित केले? असा सवाल उपस्थित करत प्रवीण धोटे, नितीन रेवतकर या आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.

आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या सरपंचाला अटक

या घडलेल्या संपूर्ण प्रकाराबद्दला ‘मुंबई TaK’ने नरखेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विद्यानंद गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘आरोग्य केंद्रावर येऊन धिंगाणा घालणाऱ्या सरपंचांविरोधात पोलिसात शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी संबंधित सरपंचाला अटक केली आहे.’

‘आम्ही राष्ट्रीय सेवाकार्य करत असताना सरपंचाने अशा प्रकारे वागून डॉक्टरांचे मनोबल खच्चीकरण होत आहे.’ अशी भावना डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

…तर महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार!

दुसरीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकार पुन्हा एकदा कठोर निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. ‘कोरोनाच्या व्हायरसला थांबवायचं असेल तर गर्दीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. राज्यात निर्बंध लावण्याचा आज तरी विचार नाही. मात्र कठोर निर्बंध लागू शकतात.’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

‘100 टक्के लॉकडाऊनची आज तरी गरज नाही. मात्र जी परिस्थिती आहे ती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगणार आहोत. टास्क फोर्स आणि इतर महत्त्वाच्या घटकांशी चर्चा करून ते यातला निर्णय घेतील.’ असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, 70 आमदार आणि 15 मंत्र्यांना कोरोना संसर्ग-राजेश टोपे

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे चिंता निर्माण झाली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. फक्त RTPCR नाही तर अँटिजेन टेस्टवर भर देणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. अजित पवार, राजेश टोपे आणि टास्क फोर्सची महाराष्ट्रातल्या वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. त्यानंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही सगळी माहिती दिली आहे.

    follow whatsapp