उस्मानाबाद : गणेश जाधव
ADVERTISEMENT
कुत्र्याने मटन खाल्ल्याच्या किरकोळ कारणावरून पित्यानेच पोटच्या मुलीवर गोळी झाडून खून केल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील एका वीस वर्षीय विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात सोमवारी नळदुर्ग पोलीस ठाण्यात मयत तरुणीच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कुत्र्याने मटण खाल्ल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचं उघड झालं आहे. साध्या मटणाच्या कारणावरून पित्याने पोटच्या मुलीची हत्या केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मयत काजल मनोज शिंदे ही तिच्या माहेरी पतीसह आई-वडिलांकडे राहत होती. रविवारी घरात मटण आणून काजलने ग्रेव्ही बनवली होती. ग्रेव्ही बनवून ती इतर काम करीत असताना ते मटण कुत्र्याने खाल्ल्याचा हा प्रकार तिची आई मीरा हिने पाहिल्यानंतर काजलवर रागावून भांडण सुरू केले. याच वेळी काजल तिच्या आईसोबत उलट भांडू लागली. याच दरम्यान वडील गणेश झंप्या भोसले हा तिथेच उभा होता. त्याला हा प्रकार कळाल्यावर तो देखील संतापला आणि खुंटीवर टांगून ठेवलेल्या गावठी बंदुकीने काजलवर गोळी झाडली. ती गोळी काजलच्या छातीत लागल्याने काजल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली.
रुग्णालयात नेत असताना वाटेतच सोडला जीव
यावेळी तिचे नातेवाईक, विशाल भोसले हे तिला जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे घेऊन जात असताना काजलचा अर्ध्या वाटेतच मृत्यू झाला. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात मयत काजलचे पती मनोज सुनील शिंदे यांनी फिर्याद दिली. त्यावरून गणेश भोसले व आई मीरा भोसले यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच गणेश भोसले व मिराबाई भोसले या दोघांनी मनोज सुनिल शिंदे, यांसही ठार मारण्याची धमकी दिली. घटना घडल्यानंतर आरोपी गणेश भोसले हा फरार झाला असून, पोलिसांनी मीरा भोसले हिस अटक केली आहे.
नळदुर्ग पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल
मनोज सुनिल शिंदे यांनी दिलेल्या तक्ररीवरुन भा.दं.सं. कलम- 302, 504, 506, 34 अंतर्गत नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळी तुळजापूर उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक सई भोरे-पाटील यांसह नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे हे करत आहेत.
ADVERTISEMENT