दाऊद, शकील, सलीम फ्रूट… नवाब मलिकांच्या केसमध्ये अंडरवर्ल्डची एंट्री; काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई तक

• 11:24 AM • 24 Feb 2022

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली. मनी लाँड्रिंग आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक टेरर फंडिंगमध्ये ‘सक्रिय’ असल्याचे ईडीने कोर्टाला सांगितले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली. मनी लाँड्रिंग आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक टेरर फंडिंगमध्ये ‘सक्रिय’ असल्याचे ईडीने कोर्टाला सांगितले.

हे वाचलं का?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या जवळच्या साथीदारांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने नवाब मलिकच्या कोठडीची मागणी केली होती. यापूर्वी ईडीने नवाब मलिक यांची मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात 8 तास चौकशी केली होती.

नुकतंच राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध FIR नोंदवला होता. याप्रकरणी ईडीने गुन्हाही दाखल केला आहे. एनआयएने Unlawful Activities Prevention Act (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नवाब मलिक यांना कोठडी का सुनावली?

– ईडीने नवाब मलिकांवर अंडरवर्ल्ड लिंक आणि टेरर फंडिंगचा आरोप लावला आहे. ईडीने न्यायालयाला सांगितले की, मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि मलिक यांच्यात अनेक मालमत्तेचे सौदे झाले आहेत आणि त्यामुळे त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात. असे एजन्सीने म्हटले आहे. ईडीने न्यायालयाला सांगितले की, जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याच्या बदल्यात मलिकांनी डी-गँग सदस्यांना पैसा पुरवला.

दाऊद, हसिना पारकर… डी-गँग सदस्यांचा संदर्भ

मलिकांच्या कोठडीची मागणी करताना, ईडीने न्यायालयात दाऊद इब्राहिम, हसिना पारकर, छोटा शकील, सलीम फ्रूट यांसारख्या डी-गँगमधील अनेक महत्त्वाच्या सदस्यांचा उल्लेख केला.

– ईडीने सांगितले की, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या हस्तकांशी संबंधित 9 ठिकाणांची झडती घेण्यात आली आहे. जिथून अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) चौकशीही करण्यात आली असून, त्यात महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

ईडीच्या म्हणण्यानुसार, सलीम फ्रूटने चौकशीदरम्यान सांगितले की, तो छोटा शकीलचा मेहुणा आहे. शकील आपल्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो. छोटा शकील पाकिस्तानातून दाऊद इब्राहिमसाठी काम करतो. पाकिस्तानात 34 वेळा छोटा शकीलच्या घरी गेल्याचेही त्याने सांगितले. सलीम फ्रूटला 2006 मध्ये UAE मधून भारतात हद्दपार करण्यात आले होते आणि 2010 पासून तो तुरुंगात आहे.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सलीम फ्रूट व्यतिरिक्त दाऊद इब्राहिमचा मेहुणा सौद युसूफ तुंगेकर (Saud Yusuf Tungekar), दाऊदचा लहान भाऊ इक्बाल कासकरचा (Iqbal Kaskar) पार्टनर खालिद उस्मान शेख आणि दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा (Haseena Parkar) मुलगा अली शाह पारकरचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

कोर्टाला सांगितले की, सलीम फ्रूट उर्फ ​​सलीम पटेल हा हसीनाचा ड्रायव्हर होता. जो खंडणीचे रॅकेट चालवत असे. तोच दाऊद इब्राहिमच्या नावावर मालमत्ता बळकावायचा आणि खंडणी मागायचा.

– अली शाह याने ईडीला सांगितले की, सलीम एका ऑफिसमध्ये बसायचा आणि तेथून गोवा कंपाउंडचे कामकाज हाताळायचा. त्याने सांगितले की, नंतर त्याची आई हसीना पारकरने आपली काही मालमत्ता नवाब मलिकला विकली. मात्र, त्या बदल्यात मलिकने त्याची आई आणि सलीमला किती पैसे दिले हे माहीत नाही.

मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न?

मालमत्ता हडपल्याप्रकरणी मुनिरा प्लंबर नावाच्या महिलेने ईडीकडे तिची जबानी नोंदवली आहे. तिने मुंबईतील कुर्ला भागात गोवावाला कंपाऊंडमध्ये 6 एकरचा भूखंड खरेदी केल्याचे सांगितले. तिने सांगितले की, ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे, जी इस्लामिक कायद्यानुसार त्यांच्या आई आणि तिच्यामध्ये विभागली गेली होती.

मुनीराने सांगितले की, 2015 मध्ये तिच्या आईच्या मृत्यूनंतर संपूर्ण संपत्ती तिच्या नावावर झाली. सलीम फ्रूट हे त्यांचे भाडेकरू असून त्यांची मालमत्ता नवाब मलिक यांच्या कंपनीत कधी हस्तांतरित झाली हे त्यांना माहीत नाही. त्यांनी सांगितले की, ती कधीही नवाब मलिकांना भेटलेली नाही. मुनिरा यांनी सांगितले की, सलीम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे आला होता आणि त्याने जमिनीशी संबंधित सर्व वाद सोडवणार असल्याचे सांगितले होते.

मुनीरा यांनी सांगितले की, तिने सलीमला पॉवर ऑफ अॅटर्नी दिली होती. परंतु मालमत्ता विकण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांची संपत्ती नवाब मलिक यांना विकल्याचे त्यांना मीडियातून समजलं.

तिने असंही सांगितले की, मलिकांनी दावा केला होता की ती तिची मालमत्ता विकण्यासाठी त्यांच्याकडे आली होती. परंतु मी कधीही त्यांच्याकडे गेली नाही. आपली मालमत्ता बेकायदेशीरपणे विकली जाईल याची आपल्याला माहिती नव्हती. असेही त्याने सांगितले.

मुनीराने ईडीला सांगितले की, मालमत्तेचा वाद मिटवण्यासाठी मी सलीमला 5 लाख रुपये दिले होते. पण सलीमला मालमत्ता विकण्याचा अधिकार दिला नव्हता. पण नंतर सलीमने आपली मालमत्ता बेकायदेशीरपणे विकली. सलीमचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आपल्याला नंतर समजले, त्यामुळे तिने एफआयआर नोंदवला नव्हता.

ईडीच्या म्हणण्यानुसार, मुनीरा प्लंबरने 12 सप्टेंबर 1989 रोजी केलेल्या तक्रारीची प्रतही सादर केली आहे. या तक्रारीत मुनीरा यांनी नवाब मलिक यांच्यावर जमीन ताब्यात घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप केला होता.

नवाब मलिकांना अटक झाल्याने महाविकास आघाडी आक्रमक; महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन

बॉम्बस्फोटाच्या दोषीनेही मलिकचा उल्लेख केला होता

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी सरदार शाहवली खानचे नावही तपासात पुढे आले आहे. खान सध्या औरंगाबाद कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ईडीनेही त्याचाही जबाब नोंदवला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, खानने सांगितले की तो जावेद चिकनाच्या माध्यमातून हसिना पारकर आणि टायगर मेमनच्या संपर्कात आला होता.

नवाब मलिक यांना कुर्ल्यातील त्या मालमत्तेत रस होता आणि ती मालमत्ता ताब्यात घेण्याची धमकी कशी देत ​​असे, असेही खान यांने सांगितले आहे.

    follow whatsapp