कोलकाता: बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. बंगाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Dey) हिचा लटकलेला मृतदेह कोलकाता येथील राहत्या घरात सापडला आहे. आज (15 मे) सकाळी पल्लवीचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासाअंती ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी सुरू केला तपास
या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पल्लवीचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पल्लवीला फासावर लटकलेले पाहून तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच पल्लवीचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
त्यानंतर पोलिसांनी पल्लवीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. पल्लवी डे हिने नेमकी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अभिनेत्रीच्या मृत्यूचं नेमकं कारणं काय हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पल्लवी डे हिच्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
बंगाली टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री होती पल्लवी
पल्लवीच्या अचानक आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. पल्लवी बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. टीव्ही शो ‘मोन माने ना’मध्ये ती लीड रोलमध्ये दिसली होती. पल्लवीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ‘रेशम झांपी’ या टीव्ही सीरियलमध्ये काम केल्यानंतर तिला विशेष ओळख मिळाली होती.
पल्लवी तिच्या चाहत्यांची लाडकी होती. तिच्या अभिनय आणि पात्रांना चांगलीच पसंती मिळाली आहे. पल्लवीच्या निधनाने इतर कलाकारांसह तिच्या प्रत्येक चाहत्यांना प्रचंड दु:ख झालं आहे. जे कदाचित त्यांच्या हृदयातून कधीच दूर होऊ शकणार नाही.
दरम्यान, पल्लवीने असं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत आता बंगालमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा गोव्यात अपघाती मृत्यू
साधारण दोन वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने देखील टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्राथमिक तपासात तरी त्याने आत्महत्या केल्याचंच बोललं जात आहे. मात्र, या प्रकरणाचा सीबीआय तपास अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे या तपासातून नेमकं काय बाहेर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT