पाकिस्तान स्थित दाऊद गँगशी संबंधित सहा संशयित दहशतवाद्यांना मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. वेगवेगळ्या राज्यातून संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यात एक मुंबईचा रहिवासी आहे. यामुळे डी-गँगचं मुंबई कनेक्शन समोर आलं असून, मुंबईत आणि मुंबई लोकलची रेकी गेली गेल्याची चर्चा केली जात आहे. मात्र, ही माहिती महाराष्ट्र एटीएसप्रमुख विनीत अग्रवाल यांनी फेटाळून लावली आहे.
ADVERTISEMENT
विनीत अग्रवाल यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंबईत रेकी केली गेली होती का? असा प्रश्न एटीएसप्रमुख विनीत अग्रवाल यांना विचारण्यात आला. त्यावर अग्रवाल म्हणाले, ‘माझं दोन दिवसांपासून दिल्ली पोलिसांशी चर्चा सुरू आहे. नीलेश ठाकूर विशेष आयुक्त आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. कालही तीन-चार वेळा त्यांच्याशी बोलणं झालं. आजही तीन-चार वेळा आमचं बोलणं झालं आहे. त्यांच्याशी समन्वय झाल्यानंतरच आमची टीम दिल्लीला जाईल’, असं ते म्हणाले.
‘मुंबईत रेकी केली गेली नाही. मुंबईत रेकी करणार होते, असं ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत. पाकिस्तानातून प्रशिक्षित व्यक्ती आली आणि तिने मुंबईत रेकी केली, असं नाहीये. रेकी केल्याची माहिती चुकीची आहे. मुंबईतून फक्त एक व्यक्ती जात होता. ज्याला प्रवासादरम्यानच अटक करण्यात आली’, असं सांगत अग्रवाल यांनी मुंबईत वा मुंबई लोकलची रेकी केल्याचं वृत्त फेटाळून लावलं.
‘असे अलर्ट येत राहतात. मुंबई सिटी सेफ आहे. इतकंच नाही तर राज्यही सुरक्षित आहे. काहीतरी होणार आहे वा होणार होतं, असा अर्थ लावू नका. कसलाही शस्त्रसाठी वा शस्त्र महाराष्ट्रात नाही. त्यांचा सूत्रधारही महाराष्ट्रात आला नव्हता. ते सगळे दिल्लीत होते. पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीप्रमाणे हे सगळे लोक तिथे जाणार होते आणि नंतर पुढील गोष्टी करणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांना पकडण्यात आलं’, असं ते म्हणाले.
कोण आहे संशयित दहशतवादी जन मोहम्मद?
एटीएस प्रमुखांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ‘जन मोहम्मदची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. पूर्वी तो मुंबईत टॅक्सी चालवायचा. नंतर त्याची नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर त्याने कर्ज काढून स्वतःची टॅक्सी घेतली होती. मात्र, कर्जाची परतफेड करू शकला नाही. हफ्ते न भरल्याने बँकेनं त्याची गाडी ओढून नेली. त्यानंतर त्याने मोटारसायकलही घेतली होती. तो झोपडपट्टीत राहायचा. एकूणच त्याची परिस्थिती हलाखीची होती. त्यातच डी-गँगने त्याच्याशी संपर्क केला असू शकतो’, असं एटीएसप्रमुख विनीत अग्रवाल म्हणाले.
ADVERTISEMENT