नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान टूल किट प्रकरण समोर आल्यानंतर बीड शहरातील शंतनू मुळूकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने शंतनूच्या बीड येथील राहत्या घरी जाऊन त्याच्या घराची झाडाझडती घेतली आहे. याचवेळी शंतनूच्या आई-वडीलांची चौकशी करण्यात आली असून त्याच्या बँक खात्याचा तपशील दिल्ली पोलिसांनी तपासला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान शंतनूच्या कुटुंबाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला म्हणून त्याची नाहक बदनमी करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. बीडच्या चाणाक्यपुरी भागात राहणारा शंतनू मुळूकने बी.ई. मेकॅनिक चं शिक्षण घेतलं असून अमेरिकेत जाऊन त्याने Ms ची पदवी घेतली आहे. आपल्या शिक्षणानंतर शंतनू पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करतोय. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर शंतनूने सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवला होता. परंतू शंतनू आणि आपलं ८ दिवसांपूर्वी बोलणं झालं. ज्यानंतर त्याच्याशी आपला संपर्कच झाला नसल्याने त्याची चिंता वाटत असल्याची प्रतिक्रीयाही शंतनूच्या आईने दिली.
शंतनू हा औरंगाबादमध्ये जॉब करत होता. पुण्यात जाऊन काहीतरी नव्याने सुरू करायचं यासाठी तो पुण्याला गेला होता. दोन दिवसांपासून दिल्ली पोलीसांचे दोन अधिकारी आमची चौकशी करत आहेत. त्यांना आम्ही सहकार्य करत आहोत, अशी माहिती शंतनूच्या पालकांनी दिली. दरम्यान शंतनूवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर त्याला स्थानिक राजकीय पक्षांकडून पाठींबा वाढताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला म्हणून देशद्रोहाचे गुन्हे दाखल होणार असतील तर सर्व शेतकरी देशद्रोही आहेत असं सरकारने सांगावं अशी प्रतिक्रीया स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT