उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनी एक स्पेशल व्हीडिओ पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वात एक करंट होता. त्याच ताकदीने ते बोलत असत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा बाळासाहेबांना भेटलो होतो ही आठवण सांगितली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओत?
मला आठवतं की मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो होतो. त्यावेळेस एक बैठक आमदारांची व्हायची. त्यात बाळासाहेब बोलायचे आणि त्यातून आमदारांना जो काही जोर चढायचा ते मी स्वतः अनुभवलं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात करंट होता. त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक समोरच्या माणसामध्ये तो करंट जायचा. त्यातनं त्या माणसालाही तो पेटवायचा. ही जी काही एक प्रचंड अशा प्रकारची नेतृत्वक्षमता त्यांच्याकडे होती. एकीकडे वज्राहून कडक अशा प्रकारची भूमिका मांडणारे बाळासाहेब होते. तर दुसरीकडे विशाल जलाशयाप्रमाणे किंवा निर्झर झऱ्यासारखे प्रेम करणारेही बाळासाहेब होते. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहो आणि ज्या विचारांनी त्यांनी आजन्म कार्य केलं त्या विचारांनी आणि त्याच गतीने आम्ही काम करत राहू.
बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृती दिन
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृती दिन आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी केली. त्यावेळी स्मारकावरून आम्ही कुठलंही राजकारण करणार नाही असं म्हटलं आहे. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी हे स्मारक सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे अशी मागणी केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं.
हे स्मारक तयार करण्याकरिता मी स्वतः मुख्यमंत्री असताना कायदा करुन ही जागा हस्तांतरित केली होती. एमएमआरडीएमधून मान्यता दिली. त्याला निधी उपलब्ध करुन दिला. पुढे एकनाथ शिंदे यांच्याकडे हा विभाग आला, त्यांनीही या कामाला निधी उपलब्ध करुन गती दिली. आता ते मुख्यमंत्री असतानाच हे काम पूर्णत्वास जात आहे. आम्हाला हे काम पूर्ण होऊन ते जनतेला समर्पित करण्यामध्ये रस आहे. त्याच्या समितीमध्ये कोण आहे यात रस नाही.
ADVERTISEMENT