फक्त फडणवीसच नाही तर ‘या’ चार मुख्यमंत्र्यांवरही ओढावला होता ‘हा’ प्रसंग

मुंबई तक

• 09:13 AM • 02 Jul 2022

मुंबई: देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे जाहीर केले आणि सर्वांनाच धक्का दिला. मी स्वत: सरकारच्या बाहेर राहून या सरकारला मदत करेल असं फडणवीसांनी जाहीर केलं होतं. परंतु काही वेळातच भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी फडणवीसांना (Devendra Fadnavis) आदेश दिला आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक नेत्यांनी फडणवीसांना शंकरराव चव्हाण केलं […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे जाहीर केले आणि सर्वांनाच धक्का दिला. मी स्वत: सरकारच्या बाहेर राहून या सरकारला मदत करेल असं फडणवीसांनी जाहीर केलं होतं. परंतु काही वेळातच भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी फडणवीसांना (Devendra Fadnavis) आदेश दिला आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक नेत्यांनी फडणवीसांना शंकरराव चव्हाण केलं अशी टिका केली. नक्की शंकरराव चव्हाणांचं काय झालं होतं? हे आपण जाणून घेवूयात. त्याचबरोबर फडणवीस हे चौथे असे माजी मुख्यमंत्री आहेत ज्यांना पुन्हा कनिष्ठ पद स्वीकारावे लागले आहे.

हे वाचलं का?

राज्यात यापुर्वी शंकरराव चव्हाण, नारायण राणे (Narayan Rane), शिवाजी पाटील निलंगेकर आणि अशोक चव्हाणांनी देखील इतर मंत्रीपद स्वीकारली आहेत. शंकरराव चव्हाण १९७५ मध्ये मुख्यमंत्री होते. पण, शरद पवारांनी १९७८ मध्ये पुलोद सरकार सत्तेवर आणलं. त्यानंतर शंकरराव चव्हाणांनी शरद पवारांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.

तुम्हाला आठवत असेल तर १९९९ मध्ये नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी सेनेला रामराम ठोकला. राणेंनी २००५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री झाले. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे जून १९८५ ते मार्च १९८६ या कार्यकाळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण, जेव्हा २००४ साली सुशीलकुमार शिंदे यांचं सरकार आलं तेव्हा निलंगेकरांनी महसूल मंत्री म्हणून काम केलं.

अशोक चव्हाण हे २००८ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण, आदर्श घोट्याळ्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, २०१४ मध्ये त्यांचं नव्या जोमानं कमबॅक झालं. लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर २०१९ च्या विधान सभा निवडणुकीतही ते विजयी झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सार्वजिनक बांधकाम मंत्री पद देण्यात आलं.

या चार माजी मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च पद भूषवल्यानंतर पुन्हा दुसरं मंत्रीपदही स्वीकारलं होतं. पण, आता या यादीत अजून एक नाव जोडलं गेलंय. २०२२ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजप-आणि एकनाथ शिंदे गटाचं सरकार आलं. यामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. यापूर्वीच पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पाहणारे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता शंकरराव चव्हाण, नारायण राणे, अशोक चव्हाण यांच्या पंक्तीत जावून बसले आहेत.

    follow whatsapp