शाळा आणि ठाकरे सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे असं म्हणत शाळा उघडण्याच्या निर्णयाचा जीआर रद्द झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले आहेत. शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, टास्कफोर्स यांनी एकत्रित बसून निर्णय जाहीर केला पाहिजे. तसं झालं तरच पालक आणि विद्यार्थ्यी यांच्यातला संभ्रम, गोंधळ दूर होईल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाण्यात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे. आज ठाण्यातील कोपरी येथे असलेल्या पुलाची त्यांनी पाहणी केली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
कोपरी पुलाचे काम आमचे सरकार आल्यानंतर सुरू झाले. ठाणेकरांची मागणी लक्षात घेऊन हे काम आता पूर्ण होत आहे. याबाबत ज्या काही तक्रारी आल्या होत्या त्या दूर झालेल्या असल्या तरीसुद्धा यातील आणखीन काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील व हा पूल ठाणेकरांसाठी भविष्यात निश्चितच लाभदायक ठरेल असे त्यांनी सांगितले. लवकरच या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भातला जीआर काढला होता. ज्यानुसार राज्यातील शाळा या 17 ऑगस्टपासून सुरू होणार होत्या. ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावी असे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनाही सरकारने जारी केल्या होत्या. मात्र ११ तारखेला कॅबिनेटची जी बैठक झाली त्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स यांच्यातही चर्चा झाली. यानंतर आधी काढलेला शाळा सुरू करण्याचा जीआर हा मागे घेण्यात आला आहे.
कोरोना काळात राज्यातील शाळा पूर्णपणे बंद असल्याने लाखो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. कोरोनाचा वाढता संसर्ग, पहिली लाट आणि दुसरी लाट या दोन्ही दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. आता कोरोनाचं प्रमाण काहीसं नियंत्रणात येत असल्याचं दिसत असल्यामुळे राज्यात शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तो मागे घेतला गेला आहे. टास्क फोर्सला हे वाटतं आहे की दहावी आणि त्याआधीच्या इयत्तांमध्ये असलेल्या मुलांचं लसीकरण झालेलं नाही त्यामुळे शाळा सुरू केली तर कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांमध्ये वाढू शकतो. या सगळ्याबाबत चर्चा केल्यानंतर हा जीआर मागे घेण्यात आला आहे. त्यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT