ADVERTISEMENT
अंगारक संकष्ट चतुर्थीला दर वेळेस राज्यातील महत्त्वाच्या गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते. मात्र, आज (2 मार्च) कोरोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी ऑफलाइन दर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी भाविकांनी मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
गणेश अंगारकी चतुर्थीला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या बाहेरील रस्त्यावर जमा होऊन भाविकांनी मनोभावे प्रार्थना केली.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सिद्धीविनायक मंदीर प्रशासनाने दर्शनासाठी काही निर्बंध घातले आहेत.
केवळ आधी जारी केलेल्या क्यूआर कोड असणाऱ्यांनाच दर्शनास परवानगी आहे, आज ऑफलाइन दर्शन मात्र बंद असणार आहे.
मागील काही महिन्यात कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर राज्यातील मंदिरं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत.
दुसरीकडे पुण्यात देखील दगडूशेट गणपती मंदिराबाहेर देखील अशाच स्वरुपाची गर्दी पाहायला मिळाली. पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे आज मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केवळ बाहेरूनच दर्शनास परवानगी आहे.
मात्र, असं असलं तरीही पुणेकरांनी तिथे बरीच गर्दी केली असल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT