मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव? परमबीर यांच्या पत्रात महत्वाची माहिती

मुंबई तक

• 05:02 PM • 20 Mar 2021

सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूशी असलेल्या संबंधांवरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं. यावेळी सत्ताधारी पक्षाने मुंबईत दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आतमहत्या प्रकरणाचा दाखला देऊन विरोधकांवर पलटवार केला. मुंबईतील हॉटेलमध्ये मोहन डेलकर यांनी आत्महत्या करुन आपल्याला प्रशासकांकडून त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. या चिठ्ठीच्या आधारावर सत्ताधारी पक्षाने विरोधकांना खिंडीत […]

Mumbaitak
follow google news

सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूशी असलेल्या संबंधांवरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं. यावेळी सत्ताधारी पक्षाने मुंबईत दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आतमहत्या प्रकरणाचा दाखला देऊन विरोधकांवर पलटवार केला. मुंबईतील हॉटेलमध्ये मोहन डेलकर यांनी आत्महत्या करुन आपल्याला प्रशासकांकडून त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. या चिठ्ठीच्या आधारावर सत्ताधारी पक्षाने विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. परंतू परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर आरोप करताना लिहीलेल्या पत्रात मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस तपासात हस्तगत केल्याचे धक्कादायक पुरावे दिले आहेत.

हे वाचलं का?

ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब ! अनिल देशमुखांनी वाझेंना दर महिन्याला १०० कोटी मागितले – परमबीर सिंग

“मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मुंबईत आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला होता. यावेळी तपासात एक सुसाईड नोट सापडली ज्यात डेलकर यांनी आपल्याला काही प्रशासकांकडून त्रास होत असल्याबद्दल लिहीलं होतं. मरीन ड्राईव्ह पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतू पहिल्या दिवसापासून गृहमंत्री या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जावा यासाठी प्रयत्नशील होते. या प्रकरणात मी न्यायालयीन तज्ज्ञांचा सल्ला घेतला. डेलकर यांची आत्महत्या मुंबईत झाली असली तरीही त्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या घटना या दादरा नगर हवेलीत घडल्या आहेत. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याच्या गुन्ह्याचा तपास करायचा असेल तर तो दादरा नगर हवेली पोलिसांना करावा लागेल असं मला सल्ला मिळाला.” परमबीर यांनी पत्रात महत्वाची माहिती दिली.

परमबीर यांचे गंभीर आरोप, अनिल देशमुख अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार !

वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मी गृहमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तुम्हाला याबद्दलची माहिती दिली. ज्यावेळी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा हा दादरा नगर हवेलीत दाखल व्हायला हवा हे मी सांगितलं त्यावेळीही गृहमंत्री हा गुन्हा मुंबईतच दाखल व्हायला हवा म्हणून आग्रही होते. मी या प्रकरणातली न्यायालयीन बाजू मांडल्यानंतर गृहमंत्री माझ्यावर नाराज होते. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा मुंबईत दाखल झाल्यानंतर मिळणारा राजकीय फायदा मिळणार नाही म्हणून गृहमंत्री नाराज होते. मी माझी बाजू मांडल्यानंतरही गृहमंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याची घोषणा केली, असं सिंग यांनी म्हटलं आहे.

विधानसभेत विरोधकांना उत्तर देताना सरकारकडून गृहमंत्र्यांनी बाहेरील राज्यातील लोकांना आपल्या पोलिसांवर विश्वास असल्याचं सांगत ते आत्महत्या करण्यासाठी इथे येत असल्याचं म्हटलं होतं. ज्यावरुन देशमुखांवर टीकाही करण्यात आली होती. त्यातच परमबीर सिंग यांनी डेलकर प्रकरणातील तपासावर केलेल्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकार डेलकर प्रकरणाचा तपास राजकीय फायद्यासाठी करुन घेत असल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींवर राज्य सरकार आपली काय भूमिका मांडतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

‘मुंबईत सतराशे बार आहेत, रेस्टॉरंट आहेत; ४०-५० कोटी सहज जमू शकतात!’

    follow whatsapp