दिशा सालियन प्रकरणात गंभीर आणि खळबळजनक आरोप करणं केंद्रीय नारायण राणेंना भोवल्याचं दिसत आहे. या प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तक्रार दिल्यानंतर महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. अखेर मालवणी पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली असल्याचं म्हटलं होतं. त्याबरोबर याच प्रकरणातून सुशांत सिंग राजपूतचीही हत्या करण्यात आली असल्याचा आरोप राणेंनी केला होता.
या प्रकरणी महापौर किशोर पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पेडणेकर यांच्या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने मालवण पोलिसांकडे चौकशी अहवाल मागवला होता. त्यानंतर आयोगाने नारायण राणे यांच्यासह त्यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा देणाऱ्या आमदार नितेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर फौजदारी कारवाईचे निर्देश दिले होते.
त्यानंतर आज मालवणी पोलीस ठाण्यात दिशा सालियनची आई वसंती सालियन यांच्या तक्रारीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर भादंवि 500, 509 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयोगाने काय म्हटलंय?
दिवंगत दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेला नसून, ती गरोदर सुद्धा नव्हती हे मालवणी पोलिसांनी राज्य महिला आयोगाला दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे.
मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशा सालियनच्या आईवडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी व बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी, अशी तक्रार आई वसंती सालियन व वडील सतीश सालियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे.
दिशाच्या मृत्यूबाबत कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांच्यावर मृत्यूपश्चात तिचे चारित्र्यहनन करणं, तिची प्रतिष्ठा मलिन करणं, तिची व कुटुंबाची बदनामी करणं त्याचबरोबर दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय यंत्रणेमार्फत सुरु असल्याची खोटी विधानं करून मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवून दबाव निर्माण करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, या कृत्याबाबत नारायण राणे यांच्याविरुद्ध तसेच त्यांनी केलेल्या आरोपांना माध्यमांवरून दुजोरा देणारे नितेश राणे व चंद्रकांत पाटील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास २४ तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले आहेत.
तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणी समाज माध्यमावर तयार करण्यात आलेले लाखो खोटे अकाउंट्स बंद करून तिच्याबद्दल नमूद असलेली खोटी माहिती तात्काळ काढून टाकण्यात यावी. आणि अर्जदार सालियन या जेष्ठ नागरिक असलेल्या दाम्पत्याला शांततेनं व सुरक्षित जगता यावे याकरिता योग्य ती सुरक्षात्मक उपाययोजना करावी व अर्जदारांच्या मागणीनुसार या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करावी.
नारायण राणेंनी नेमकं काय विधान केलेलं?
१९ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, दिशा सालियनचा मित्र रोहन राय याने तिला पार्टीला बोलावलं होतं. ती पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षा रक्षक होते? ८ जून रोजी दिशा सालियन हिची बलात्कार करून हत्या झाली. ही गोष्ट सुशांत सिंह याला समजली. सुशांत सिंह राजपूतने याबद्दल आवाज उठवायचा निर्णय घेतला. त्यामुळे सुशांत सिंह यालाही त्याच्या घरी जाऊन ठार मारण्यात आलं”, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केलेला आहे.
ADVERTISEMENT