नवी दिल्ली: सध्या सुरू असलेल्या जागतिक लसीकरण (Vaccination) मोहीमेदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी असा इशारा दिला आहे की, कोणीही दोन वेगवेगळ्या लसी मिक्स करुन त्याचा डोस घेऊ नये. कारण हे धोकादायक ठरू शकते.
ADVERTISEMENT
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार हा धोकादायक ट्रेंड आहे. कारण आतापर्यंत यासंदर्भात कोणताही डेटा उपलब्ध नाही.
यासह, त्यांनी इशारा दिला आहे की, लसीचे (Vaccine) दोन्ही डोस वेळेवर घेणे अत्यंत आवश्यक आहे. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, वेगवेगळ्या देशात लोकांनी स्वत:हूनच ठरवलं की, दुसरा किंवा तिसरा डोस कधी घ्यायचा तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
भारतात वेगवेगळ्या लसी देण्याच्या घटना समोर आल्या आहेत
काही दिवसांपूर्वी भारतात अशा घटना समोर आल्या आहेत. जिथे काही लोकांना लसीचे दोन वेगवेगळे डोस देण्यात आले होते. तथापि, प्रशासनाच्या चुकीमुळे असं घडल्याचं समोर आलं होतं. पहिला डोस हा एका लसीचा आणि दुसरा डोस हा दुसऱ्याच लसीचा दिल्याचं समोर आल्याने एकच खळबळ माजली होती. दरम्यान, सध्या मिक्स व्हॅक्सिनबाबत जगभरात प्रयोग सुरु आहेत.
दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देणं हे फायदेशीर ठरु शकतं का? यावर सध्या रिसर्च सुरु आहे. अशाप्रकारे लोकांना लस दिल्यास ती फायदेशीर ठरु शकते का? याचा देखील अभ्यास केला जात आहे. या विषयावर बरेच शास्त्रज्ञ संशोधनही करीत आहेत. परंतु आतापर्यंत कोणताही ठोस डेटा समोर आलेला नाही, जो या गोष्टीला आधार देईल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, वेगवेगळ्या लसींच्या दोन डोसमध्ये निश्चित कालावधी असतो. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस हे निश्चित फरकाने दिले जात आहेत. ज्यामुळे कोरोनाविरूद्ध लढण्यास मदत होईल.
पहिला लस Covishield चा, दुसरा Covaxin चा; उत्तर प्रदेशमध्ये भयंकर प्रकार
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) सिद्धार्थनगरमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत बेफिकीरपणे लसीकरण करण्यात आल्याचं समोर आलं होतं. कारण येथे काही जणांना कोरोना प्रतिबंधक लस देताना पहिला डोस कोव्हिशिल्ड (Covishield) आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा (Covaxin) देण्यात आला होता.
Vaccine चे कॉकटेल डोस घेतले पाहिजेत की नाही? तज्ज्ञ काय म्हणतात?
ही एक अक्षम्य अशी चूक आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या चुकीमुळे लोकं फारच भयभीत झाले होते. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या आरोग्य मंत्रालयात देखील एकच खळबळ माजली होती. दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील आणखी एका गावात जवळजवळ 20 लोकांना पहिला डोस हा कोव्हिशिल्डचा देण्यात आला होता. पण 14 मे रोजी दुसरा डोस देताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी अतिशय बेफिकीरपणे या 20 जणांना कोव्हॅक्सिनचा डोस दिला गेला होता.
हा संपूर्ण प्रकार उजेडात आल्यानंतर आरोग्य विभागातील प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवत होते.
ADVERTISEMENT